‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता व लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे. रेव्ह पार्टीत सापांचे विष पुरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नोएडा पोलिसांनी कारवाई करत एल्विश यादवला अटक केली आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता या प्रकरणी मोठी अपडेट आली आहे.
एल्विशने सापांचं विष पुरवल्याची कबुली दिल्याचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. एल्विशने रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाची व्यवस्था केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सापाचं विष पुरवल्याप्रकरणी त्याला रविवारी (१७ मार्च रोजी) अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने चौकशीत कबूल केलं की सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी गेल्या वर्षी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींना तो ओळखतो.
‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवला अटक, नोएडा पोलिसांची मोठी कारवाई
२६ वर्षीय एल्विशने यापूर्वी याप्रकरणात आपला सहभाग नसल्याचं विधान केलं होतं. पण आता पोलीस चौकशीत त्याने मान्य केलं की तो तो वेगवेगळ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये आरोपींना भेटला होता आणि तो त्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
नोव्हेंबर महिन्यात नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या ५ गारुडींना अटक केली होती. त्यांच्याकडून ५ कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आले होते. या आरोपींनी सांगितलं की ते एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचे. त्यानंतर एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात एल्विशला अटक झाली आहे. आरोप सिद्ध झाल्यास मी नग्न होऊन नाचेन असं विधान काही दिवसांपूर्वी करण्याऱ्या एल्विशने आता गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.