Mirzapur 3 Release Date: अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि रसिका दुग्गल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली वेब सीरिज ‘मिर्झापूर ३’ची जोरदार चर्चा सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या यशानंतर आता ‘मिर्झापूर ३’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडीओ’वर ‘मिर्झापूर ३’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…
बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार, यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून अनेक वृत्त समोर आली आहेत. पण आता जी प्रदर्शनाची तारीख सांगितली जात आहे, हे वाचून ‘मिर्झापूर’ सीरिजच्या चाहत्यांना आनंद होईल.
गुरुवारी ‘प्राइम व्हिडीओ’ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत काही पोस्टर शेअर केले. या पोस्टरमधून प्रदर्शनाच्या तारखेबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. पण यानंतर लवकरच निर्मात्यांकडून ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
‘इ टाइम्स’च्या वृत्तातून ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत माहित देण्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘मिर्झापूर ३’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. त्यामुळे सध्या ‘मिर्झापूर ३’ची जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – Video: पारू आणि आदित्यचं झालं लग्न! पण क्षणार्धात…; ‘पारू’ मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं वेधलं लक्ष
‘मिर्झापूर ३’मध्ये काय पाहायला मिळणार?
‘मिर्झापूर २’ सीरिजच्या शेवटी मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा)ला मारून गुड्डू पंडित (अली फजल) मिर्झापूरच्या खुर्चीवर बसतो आणि कालीन भैय्याला सोडून देतो. आता ‘मिर्झापूर ३’मध्ये कालीन भैय्या आपल्या खुर्ची आणि लेकाच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे. त्यामुळे हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘मिर्झापूर ३’मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये झळकणार आहेत.