Prajakta Koli Wedding : बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळीचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. आता अभिनेत्री दीड वर्षांनी लग्नबंधनात अडणार आहे. प्राजक्ताने मेहंदी सोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता कोळी तिचा नेपाळी बॉयफ्रेंड वृषांक खनालशी लग्न करणार आहे. प्राजक्ता व वृषांक गेली १३ वर्षे एकमेकांबरोबर आहेत. दोघांनीही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. अभिनेत्रीच्या आई-वडिलांबरोबर वृषांकचं खूप सुंदर बॉण्डिंग असल्याचं त्यांच्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. वृषांक मूळचा नेपाळचा असून गेली अनेक वर्ष तो कामानिमित्त मुंबईत राहत आहे.
प्राजक्ता व वृषांकचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय प्राजक्ताच्या मेहंदी सोहळ्यातील एक इनसाइड व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. यामध्ये अभिनेत्री ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता, वृषांक व अभिनेत्रीची आई या तिघांनी मिळून वऱ्हाड्यांसह ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. प्राजक्ताच्या मेहंदी सोहळ्यातील मराठमोळ्या अंदाजावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्राजक्ता आणि वृषांक कर्जत येथे २५ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. हळद, मेहंदी, संगीत असे सगळे विधी पार पडल्यावर ही जोडी ‘साता जन्माची गाठ’ बांधणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता कोळीबद्दल सांगायचं झालं, तर युट्यूबवर ती ‘मोस्टलीसेन’ नावाने ओळखली जाते. ‘मिसमॅच्ड’ या सीरिजमुळे ती आणखी प्रसिद्धीझोतात आली. या सीरिजच्या तिन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्याबरोबर तिने ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटात सुद्धा काम केलं आहे. ती विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘नीयत’ चित्रपटात देखील झळकली होती. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता कोळीने लेखिका म्हणून देखील पदार्पण केलं आहे.