गेल्या काही दिवसांपासून विविध विषयांवर वेबसीरिज प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता लवकरच जिओ सिनेमावर एक हलकीफुलकी कॉमेडी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एका काळेचे मणी’ असे या नव्या मराठी मालिकेचे नाव आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते प्रशांत दामले सिरीज क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.
‘एका काळेचे मणी’ या वेबसीरिजमध्ये पिढ्यांमधील संघर्ष अगदी विनोदी पद्धतीने दाखवला जाणार आहे. याबरोबरच परंपरागत मध्यमवर्गीय मुल्यांचा अंगिकार करणारे पालक, मुलांची जीवनशैली आणि त्यांचे अपरंपरागत मार्ग चोखाळणे यांच्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात येणार आहे. ही कथा एका मराठी कुटुंबावर आधारित असल्याचे पाहायला मिळत आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून वडिलांना कुटुंबाची चिंता पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आईला त्याच्या मुलाच्या लग्नाची चिंता सतावत आहे.
आणखी वाचा : Video : “साडीच्या रंगाचा परकर मिळाला नाही का?” रील व्हिडीओमुळे मानसी नाईक ट्रोल
तसेच त्यांची मुलगीही प्राणीप्रेमी आहे. पाळीव प्राण्यांसाठी कपड्यांचा ब्रॅन्ड तयार करणे हे तिचे स्वप्न आहे. तर त्यांचा मुलगा आयर्लंडमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा भारतात येण्याचा त्याचा मानस आहे. लग्न जुळवण्याच्या खटपटीत कुटुंबाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, हे यात पाहता येणार आहे.
आणखी वाचा : “कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही…” प्रशांत दामलेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
या वेबसीरिजचे दिग्दर्शन अतुल केळकर यांनी केले आहे. यात प्रशांत दामले हे श्री काळेंच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच या वेबसीरिजची निर्मिती महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे. या वेबसीरिजमध्ये प्रशांत दामलेंबरोबरच पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघुले विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.