Priya Bapat New Movie : रुपेरी पडद्यावर नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याकडे प्रिया बापटचा कल असतो. प्रियाने बालपणापासूनच काम करायला सुरुवात केली होती. नाटक, मालिका, सिनेमा, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्रीची ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही सीरिज देशभरात प्रचंड गाजली. या सीरिजनंतर प्रियाच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटात लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. प्रिया एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रिया बापट तिच्या आगामी चित्रपटात ‘सेक्रेड गेम’ फेम बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या सिनेमाचा मुहूर्त पार पडला होता. आता या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

प्रिया बापट आणि नवाजुद्दिन सिद्दिकी यांची जोडी प्रेक्षकांना ‘कोस्टाओ’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, या सिनेमात नवाजुद्दिन रिअल-लाइफ कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

अधिकृत सरकारी वेबसाइट्स व टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोस्टाओ फर्नांडिस यांना Rare Hero म्हणून ओळखलं जातं. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तस्करीच्या अनेक घटना रोखल्या आहेत. फुटबॉलप्रेमी असलेले कोस्टाओ फर्नांडिस १९७९ मध्ये गोवा कस्टममध्ये प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर म्हणून रुजू झाले होते. त्यांचा प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, प्रिया बापट बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर काम करणार असल्याचं पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे. या सिनेमाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.