प्रिया बापट सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. ही वेब सीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असून यामध्ये प्रिया बापटबरोबर अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन २६ मे रोजी प्रदर्शित होणार असून, यामध्ये अभिनेत्री प्रिया बापट ‘पौर्णिमा गायकवाड’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या निमित्ताने प्रिया अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. या वेळी ‘पौर्णिमा गायकवाड’ ही भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घेतली याबाबत प्रियाने माहिती दिली. प्रिया म्हणाली, “राजकारणी कसे उभे राहतात, कसे चालतात, त्यांची देहबोली कशी असते याचे मी यूट्यूबवर असंख्य व्हिडीओ पाहिले. रीतसर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करीत या भूमिकेसाठी तयारी केली.”
हेही वाचा : ‘या’ प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने फक्त १.५ लाखांत केलेलं स्वतःचं लग्न, लेहेंग्याची किंमत होती फक्त…
‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये‘ पौर्णिमा गायकवाड’ ही मुख्य भूमिका साकारताना कोणाकडून प्रेरणा घेतली, हा प्रश्न केल्यावर प्रिया म्हणाली, “‘पौर्णिमा’ हे संपूर्णपणे वेगळे व्यक्तिमत्त्व असून अलीकडच्या राजकारण्यांबरोबर या भूमिकेची तुलना करू शकत नाही; कारण ‘पौर्णिमा’चे कोणाशीही साम्य जुळत नाही, ती खऱ्या अर्थाने वेगळी आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना कोणाकडून प्रेरणा घ्यायची असेल, तर मी एखाद्या खेळाडूकडून घेईन राजकारण्याकडून नाही.”
हेही वाचा : “कर्नाटक निवडणुकीत मतांसाठी…”, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका
दरम्यान, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता, तर या वेब सीरिजचा दुसरा सिझन २९ जुलै २०२१ प्रदर्शित झाला होता. यानंतर आता येत्या २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन ‘डिस्नी + हॉटस्टार’वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.