बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा चांगलीच चर्चेत असते. हॉलिवूडचा नवा प्रोजेक्ट ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिरल सीरिजमुळे सध्या ती पुन्हा चर्चेत आली आहे. या वेबसीरिजच्या शूटिंगच्या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या सीरिजमधील तिच्या या नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नुकतंच प्राइम व्हिडिओने या वेबसीरिजबद्दल नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने या अॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर सिरीजचे फर्स्ट-लूक फोटो प्रदर्शित केले आहेत. इतकंच नव्हे तर या सीरिजच्या प्रीमियरबद्दलही मोठी घोषणा केली आहे. या सिरीजच्या २ एपिसोडचा प्रीमियर शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, यानंतर २६ मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाईल असंही सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा : “लोक तुम्हाला खाली खेचणार…” नव्या जाहिरातीतून रणवीर सिंगचं ट्रोलर्स अन् टीकाकारांना चोख उत्तर
रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यामध्ये स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिलसारख्या कलाकारांसह रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्याही मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ‘सिटाडेल’ ही सिरीज जगभरातील २४० देश आणि वेगवेगळ्या प्रदेशांमधील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोमधील प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस लूक चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या हॉलिवूडमधील इतर प्रोजेक्टप्रमाणे यातही नेमकी तिची भूमिका कशी असेल याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. याबरोबरच प्रियांका चोप्रा लवकरच फरहान अख्तर निर्मित झोया अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात प्रियांकाबरोबर आलिया भट्ट आणि कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.