Paani Movie OTT Release: बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘पाणी’ ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘पाणी’ आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीज पोस्ट केल्या आहेत. त्यात पाणी चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळते. हा चित्रपट आता प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, असं त्यात लिहिलं आहे.

प्रियांका चोप्राने केलेली पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

नितीन दीक्षित यांनी लिहिलेल्या ‘पाणी’मध्ये अदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी आणि विकास पांडुरंग पाटील यांनी काम केलं होतं. नेहा बडजात्या आणि दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनास आणि डॉ. मधु चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा या प्रकल्पाचे सहयोगी निर्माते आहेत. १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

‘पाणी’ हा चित्रपट पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या समस्येवर भाष्य करतो. गावात पाणी आणून किमान पाण्याच्या बाबतीत गावाला स्वावलंबी करणाऱ्या नांदेडमधल्या नागदेरवाडी गावातील हनुमंत केंद्रे यांची वास्तव कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता; आता ओटीटीवर तो प्रेक्षकांना आकर्षित करतो की नाही, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra marathi film paani released on ott hrc