Pushpa 2 OTT Release Update: अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा 2’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मागील १४ दिवसांत जगभरात जवळपास १५०० कोटींचा व्यवसाय केला आहे. ग्रँड ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपट अजूनही दररोज कोट्यवधी रुपयांचे कलेक्शन करत आहे.
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना व फहाद फासिल यांच्या ‘पुष्पा 2’ने मूळ तेलुगू भाषेपेक्षा हिंदीत जास्त कमाई केली आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘पुष्पा: द राइज’चा हा दुसरा भाग आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत असतानाच त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
‘पुष्पा 2’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
चाहते ‘पुष्पा 2’ ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे हक्क तब्बल २७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. मात्र हा चित्रपट घरबसल्या पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
‘पुष्पा 2’ नेटफ्लिक्सवर केव्हा पाहता येणार?
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतो. अशा परिस्थितीत हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येईल. प्रेक्षकांना जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर पाहता येईल, अशी शक्यता आहे.
‘पुष्पा 2’ हा पॅन इंडिया चित्रपट आहे. तो थिएटर्समध्ये तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम व कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवरही तो या पाचही भाषांमध्ये रिलीज केला जाईल. सुकुमार दिग्दर्शित या सिनेमाने १४ दिवसांत भारतात ९६२.०४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाला अजुनही थिएटर्समध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.