दुलकर सलमान, सनी देओल, पूजा भट्ट, श्रेया धन्वंतरी अशा कलाकारांची फौज असलेला चूप हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसच्या यशानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. झी ५ने आपल्या ट्वीटर अकाउंटवर ही घोषणा केल्यानंतर सध्या सोशल मीडियावर #Chup ट्रेंडिंग आहे. या बातमीने दुलकर सलमानचे चाहते खूप खूश आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट ओटीटीवर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आर बाल्की यांच्या ‘चूप’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची कथा एका मनोरुग्णाच्या जीवनावर बेतलेली आहे जो चित्रपट समीक्षकांची निर्घृण हत्या करत सुटला आहे. त्याच्या या हत्यांमुळे समीक्षकांनी समीक्षण करायचं बंद केलं आहे. या एकूण कथानकातून बाल्की यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपटसृष्टी आणि त्याभोवतालचं वातावरण यांवर कटाक्ष टाकला आहे.