‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. एकूणच कलाविश्व आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल राज ठाकरे यांनी मनमोकळेपणाने आपली मतं मांडली, शिवाय त्यांना आवडणाऱ्या वेबसीरिजबद्दलही त्यांनी खुलासा केला.

याच मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना तेजस्विनीने ओटीटीवरील सेन्सॉरशिपबद्दल प्रश्न विचारला. यावरदेखील राज यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. एकूणच ओटीटी विश्वात ज्याप्रकारच्या गोष्टी दाखवल्या जातात आणि त्यावर कोणाचा अंकुश हवा याविषयी राज यांनी सविस्तरपणे त्यांचं मत मांडलं आहे.

याविषयी राज ठाकरे म्हणाले, “खरंतर हा खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्या सीरिजमध्ये तुम्ही काय दाखवणार आहात आणि त्याचा कथेशी कितपत संबंध आहे याचा विचार व्हायला हवा. मध्यंतरी माझ्या पाहण्यात एक सीरिज आली ज्यात फक्त व्याकरणापुरतं मराठी भाषेचा वापर करण्यात आला होता, बाकी पूर्ण शिव्यांचा भडिमार होता. आपण परदेशातील कित्येक गोष्टींचं अनुकरण करतो, पण अजून इतक्या वर्षांनीही आपल्याकडे लोकशाही नीट रुजायची आहे.”

आणखी वाचा : तेलुगू सुपरहीरो चित्रपट ‘हनुमान’चा टीझर प्रदर्शित; नेटकऱ्यांनी केली थेट प्रभासच्या ‘आदिपुरुष’शी तुलना

ओटीटीवरील बंधनाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही प्रकारच्या बंधनामध्ये अडकणारा माणूस मी नाही. ज्या ठिकाणी गरज किंवा कथेची आवश्यकता असेल तिथे कोणतीही बंधनं येता कामा नयेत असं माझं मत आहे.” एवढ्यावर बोलून राज ठाकरे थांबले नाहीत, तर त्यांनी मराठी कलाकारांना कोणती बंधनं आली आहेत का असा सवाल केला, शिवाय काही बंधनं आली असतील तर त्याविषयी मनमोकळेपणाने बोला असं आश्वासनही त्यांनी कलाकारांना दिलं.

Story img Loader