राजकुमार राव बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या वर्षामध्ये त्याचे ‘बधाई दो’ आणि ‘हिट-द फस्ट केस’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. तो पुढच्या महिन्यामध्ये नव्या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटाशी संबंधित नवी बातमी समोर आली आहे.
‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ असे राजकुमारच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह राधिका आपटे, हुमा कुरेशी आणि सिकंदर खेर असे कलाकार दिसणार आहेत. मागच्या महिन्यामध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरवरुन हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर या चित्रपट शैलीतला आहे असा अंदाज लावला जात आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.
नेटफ्लिक्सच्या ट्विटर हँडलवर “तू आधीपासूनच आमच्या हृद्यावर राज्य करत आहेस, तुला प्रेम मिळवण्यासाठी पंजाची गरज नाही हे राजकुमार रावला कोणीतरी जाऊन सांगा”, असे ट्वीट केले आहे. या ट्वीटसह चित्रपटाचे नवे पोस्टर जोडले आहे. पोस्टरमध्ये राजकुमार राव एका मशीनच्या दोन पंजाच्या मधल्या जागेत अडकला आहे असे दिसते. या चित्रपटामध्ये तो मॅकेनिकल इंजिनिअरच्या भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे असेही पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या चित्रपटानंतर त्याचे ‘भीड’ आणि ‘मिस्टर अॅन्ड मिसेस माही’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याची ‘गन्स अॅन्ड गुलाब’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये त्याने दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसह काम केले आहे.