सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट सीरिजच्या पहिल्या भागाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या हीट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, मतभेद समोर आले. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटातील व्हीएफएक्सची चांगलीच खिल्ली उडवली गेली. मात्र रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्रि लोकांना प्रचंड आवडली.
या चित्रपटालाही बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हीट ठरला आहे. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बाबत बरीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हा चित्रपट सुरुवातीला नेटफ्लिक्सवर येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मात्र डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हंटलं जात आहे.
आणखी वाचा : ६०० रुपयांची साडी, बॅग मात्र ३.५ लाखांची; स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरणाऱ्या कंगनाची पोस्ट चर्चेत
ओटीटीच्या नियमानुसार कोणताही चित्रपट प्रदर्शनानंतर ६० दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो. पण मध्यंतरी ‘ब्रह्मास्त्र’ दिवाळीच्या आधीच प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा सुरू होती. येत्या २३ ऑक्टोबरला हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता हा चित्रपट २३ तारखेला ओटीटीवर येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच चित्रपटाशी संबंधित व्यक्तीकडून अजूनतरी याबाबत अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. ज्यांनी हा चित्रपट चुकवला आहे ती मंडळी याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्टबरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. दिग्दर्शक अयान मुखर्जीने याचा पुढील भाग २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं आहे.