रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. ‘अॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.
फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. टीका होत असली तरी बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. बॉक्स ऑफिसवर तर हा चित्रपट आणखी धुमाकूळ घालणार आहेच, पण अशातच आता लोकांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचे वेध लागले आहेत.
आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’मध्ये भाव खाऊन गेला ‘हा’ मराठी अभिनेता, अजय-अतुलच्या गाण्यानेही वाढवली रंगत
नुकतंच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजशी निगडीत काही माहिती समोर आली आहे. हा चित्रपट आणखी काही दिवस तरी बॉक्स ऑफिसवरुन हलणार नसल्याने याच्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागू शकते, परंतु हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे ते स्पष्ट झालं आहे. रणबीर कपूरच्या या ‘अॅनिमल’चे स्ट्रीमिंगचे हक्क किंवा डिजिटल हक्क हे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे असल्याने हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे नक्की झालं आहे.
अद्याप बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळत असल्याने ओटीटी रिलीजबद्दल याच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायचं धाडस होत नाहीये ते प्रेक्षक खासकरून याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. मीडिया रीपोर्टनुसार ‘अॅनिमल’चं बजेट हे जवळपास १०० कोटी इतकं होतं. कमाईच्या या बाबतीत हा चित्रपट त्याहीपलीकडे गेला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.