रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट गेल्या वर्षअखेरीस प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणापासून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या नव्या चित्रपटात रोहित शेट्टी काय धमाल करतोय हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर होते. पण प्रेक्षकांचा मोठा भ्रमनिरास झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात चित्रपट अपयशी ठरला.
सलग सुपरहीट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटाची ही अवस्था पाहून बॉलिवूडमधील मोठमोठे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना धक्काच बसला. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बाबतीत नवी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट लवकरच आता ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. खरंतर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद न मिळाल्याने तो लवकर ओटीटीवर प्रदर्शित करावा लागतो आहे असं काही तज्ञ मंडळींचं मत आहे.
आणखी वाचा : गौतमी पाटीलने मागितली पुन्हा माफी; अजित पवारांना उद्देशून म्हणाली “मी सुधारले आहे तरी…”
रणवीर सिंगचा ‘सर्कस’ १७ फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर दीपिका पदुकोणचीही झलक या चित्रपटात पहायला मिळते. या चित्रपटाची संपूर्ण टीम मिळून सर्कसचं जोरदार प्रमोशन करत होती. त्याचप्रमाणे या चित्रपटाचा ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपट चांगली कामगिरी करू शकतो असं सर्वांना वाटत होतं मात्र तसं झालं नाही.
आता ज्या लोकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळाला नाही त्यांना हा ओटीटीवर पाहायला मिळणार आहे, शिवाय ओटीटीवर तरी हा चित्रपट चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. रोहित शेट्टी आता त्याच्या आगामी कॉप युनिव्हर्सच्या ‘सिंघम’च्या पुढच्या भागासाठी तयारी करत आहे. शिवाय तो विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना घेऊन एक वेबसीरिजही आपल्यासाठी घेऊन येत आहे.