‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये पहिल्याच भागात बॉलिवूडची स्टार जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. यावेळी रणवीर-दीपिकाने करण जोहरसमोर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. दोघांनीही २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामलीला’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटादरम्यानच ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं हे निव्वळ अशक्य होतं असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला. यानंतर त्यांनी डेटिंगला सुरुवात केली अन् त्यांनी २०१५ मध्ये गुपचुप साखरपुडा उरकला आणि त्यांनी ही गोष्ट बऱ्याच लोकांपासून लपवूनच ठेवली होती. भन्साळी यांच्या ‘गोलीयों की रासलीला राम-लीला’च्या चित्रीकरणादरम्यानचे किस्सेदेखील रणवीर आणि दीपिकाने शेअर केले.
सेटवर ते कायम एकमेकांबरोबरच वेळ घालवायचे. या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाचा एक मोठा किसिंग सीन चित्रित करण्यात आला व त्याची खूप चर्चाही झाली. याचबाबत एक खुलासा या दोघांनी ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर केला. त्या किसिंग सीनदरम्यान त्यांच्या मागून एक वीट त्यांच्या रूमची कांच फोडून आत येणार होती. जेव्हा त्या सीनदरम्यान काच फोडून जेव्हा वीट आत आली तेव्हा त्या दोघांना त्या गोष्टीचा अक्षरशः विसर पडला होता व ते त्या सीनमध्ये मग्न झाले होते.
यानंतर रणवीरने दीपिकाला प्रपोज कसं केलं याविषयीही खुलासा केला. त्यांच्या आयुष्यातील अशाच कधी धमाल गोष्टींचे खुलासे त्यांनी करण जोहरच्या या शोमध्ये केले. लग्नानंतर ५ वर्षांनी दोघांनीही ‘कॉफी विथ करण’मध्ये त्यांच्या लग्नातील खास व्हिडीओ शेअर केला. रणवीर-दीपिकाच्या लग्नातील सगळे विधी, दोघांचा पारंपरिक लूक आणि कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली. त्या दोघांच्या लग्नातील हा व्हिडीओ पाहून करण जोहर त्याच्या चॅट शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं.