बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचणाऱ्या ‘कांतारा’ची अजूनही चर्चा सुरूच आहे. अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर साऱ्या जगभरातील प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
आता ‘कांतारा’ अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या आठवड्यातच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार होता, पण चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर चालत असल्याने याची ओटीटी रिलीज डेट पुढे ढकलली गेली होती. आता २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा : सुपरस्टार कमल हासन रुग्णालयात दाखल
अजूनतरी हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर उपलब्ध नसून हा चित्रपट केवळ कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रचंड आतुरतेने वाट पाहत होते. आता या ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट आणखी जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
‘कांतारा’ या चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका लोककलेवर आधारित आहे. दक्षिण भारतातील परंपरा, ग्रामदैवत आणि तिथल्या आदिवासी लोकांची श्रद्धा यावर हा चित्रपट भाष्य करतो. रिषभ शेट्टीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून याची कथा आणि दिग्दर्शनसुद्धा रिषभनेच केलं आहे. या चित्रपटामुळे रिषभ रातोरात सुपरस्टार झाला आहे. सध्या तरी हा चित्रपट मूळ दाक्षिणात्य भाषांमध्ये अॅमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे.