The Family Man 3 actor Rohit Basfore found dead : मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मनोज वाजपेयी यांची बहुचर्चित वेबसीरिज ‘फॅमिली मॅन’मधील अभिनेता रोहित बसफोरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अभिनेत्याच्या मित्राने त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती पोलिसांना कळवली. रविवार, २७ एप्रिल रोजी दुपारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गुवाहाटीजवळील एका धबधब्यावर रोहितचा मृतदेह आढळल्याचं सांगण्यात येत आहे. अभिनेता त्याच्या मित्रांसह पिकनिकसाठी गेला असताना धबधब्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं जात आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, रोहित बसफोर काही महिन्यांपूर्वी मुंबईहून गुवाहाटीला आला होता. रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास तो त्याच्या मित्रांबरोबर फिरायला बाहेर पडला. यानंतर त्यांचे कुटुंबिय त्याच्याशी संपर्क साधत होते, पण यादरम्यान त्याचा काही संपर्क झाला नाही. मग काही तासांनंतर एका मित्राचा फोन आला, ज्याने रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या धक्कादायक बातमीमुळे अभिनेत्याचे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी असं म्हटलं की, “आम्हाला दुपारी ४ च्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही ४:३० वाजता घटनास्थळी पोहोचलो. नंतर एसडीआरएफच्या पथकाने सायंकाळी ६:३० च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, रोहित चुकून धबधब्याखाली पडला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.”

या दु:खद घटनेनंतर कुटुंबाने या संपूर्ण घटनेत गैरप्रकार असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात काही गूढ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कुटुंबियांचा दावा आहे की, त्याला एका दुर्गम ठिकाणी नेण्यात आले, जिथे दुपारी १२ वाजता त्याचा फोन बंद होता आणि अभिनेत्याला पोहणे येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर रोहित बासफोरची तपासणी केली, तेव्हा त्याच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा दिसून आल्या.

काही वृत्तांनुसार, रोहितच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या अनेक भागांवर खोल जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे कुटुंबियांना त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता प्रकरणी कोणती माहिती समोर येते, हा अपघात आहे की घातपात याबद्दल अभिनेत्याचे कुटुंबिय प्रतीक्षेत आहेत.