बॉलीवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याचे पालक अॅक्शन डायरेक्टर एमबी शेट्टी आणि स्टंटवुमन रत्ना शेट्टी यांच्याबद्दल काही खुलासे केले आहेत. रत्ना शेट्टी यांना बॉलीवूडमधील त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली होती. १९७२ साली आलेल्या ‘सीता और गीता’ चित्रपटात हेमा मालिनी यांच्या बॉडी डबल म्हणून रोहित शेट्टीच्या आई रत्ना यांनी काम केलं होतं.
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित शेट्टी म्हणाला की हाडं मोडल्याने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. ‘सीता और गीता’ या चित्रपटातील हेमा मालिनी यांची बॉडी डबल त्याची आई होती याचा खुलासा त्याने केला. “माझी आई स्टंटवुमन होती. तिने ‘सीता और गीता’ मध्ये काम केलं होतं. तुम्हाला पोस्टरमध्ये पंख्यावर बसलेली दिसते ती हेमा मालिनी ही माझी आई आहे,” असं तो म्हणाला. रत्ना शेट्टी यांनी दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमालासाठी बॉडी डबल म्हणून काम केलं होतं, असंही रोहितने सांगितलं. “जिन्यावरून खाली पडणारी वैजंतीमाला ही माझी आई आहे. तिची शरीरयष्टी तशी होती,” असं रोहित म्हणाला.
मुलाखतीत रोहित शेट्टीने वडिलांचा उल्लेख केला. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काच तोडण्याच्या सीनचा शोध लावण्याचं श्रेय एमबी रेड्डी यांना जातं. “त्यांनी ‘दीवार’, ‘यादों की बारात’, ‘ग्रेट गॅम्बलर’, ‘डॉन’, ‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’ आणि ‘त्रिशूल’ सारख्या चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन दिग्दर्शित केले. चित्रपटांमध्ये काच फोडण्याचा शोध त्यांनी लावला. त्यांना खूप जखमाही झाल्या. बऱ्याचदा ते रक्ताचे डाग घेऊन घरी यायचे, त्यांच्या हाताला टाकेही लागलेले असायचे,” असं रोहितने सांगितलं.
आपल्या कार स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला रोहित सांगतो की त्याचे सर्व अॅक्शन सीक्वेन्स त्याच्या पालकांच्या अॅक्शन स्टंटचे परिणाम आहेत. “म्हणूनच मी असा आहे. हाडं मोडण्याचा आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे. स्वतःची हाडं मोडणं हे आमच्या डीएनएमध्ये आहे,” असं रोहितने सांगितलं.
दरम्यान, रोहित शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. या सात भागांच्या सीरिजमध्ये अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळतात. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि मयंक टंडन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.