सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. सलमान त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या बेधडक स्वभावामुळेही बऱ्याचदा चर्चेत असतो. यंदाच्या ‘फिल्मफेअर २०२३’ या सोहळ्याची सूत्रसंचालनाची जवाबदारी सलमान खानकडे सोपवण्यात आली आहे. नुकतंच सलमानने ‘फिल्मफेअर’च्या प्रेसमीट मध्ये हजेरी लावली.
या कार्यक्रमात सलमानने बऱ्याच गोष्टींवर त्याचं मत मांडलं आणि पत्रकारांशी गप्पा मारल्या. याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट आणि त्यावर येणारा बीभत्स अश्लील कंटेंट याबद्दलही सलमानने भाष्य केलं आहे. या विषयावर सलमानने त्याची रोखठोक बाजू मांडली आहे. इतकंच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशीप येण्याबद्दलही त्याने बाजू मांडली.
सलमान म्हणाला, “मला खरोखर असं वाटतं की या माध्यमांवर कोणाचा तरी अंकुश असावा. ही अश्लील दृश्यं, नग्नता, शिवीगाळ हे सगळं थांबायला हवं. सध्या १५-१६ वर्षांची मुलंही हे बघतात, अभ्यासाच्या नावावर एखाद्या १६ वर्षाच्या लहान मुलीने मोबाईलवर हे सगळं बघितलं तर ते तुम्हाला तरी आवडणार आहे का? ओटीटीवर येणारी प्रत्येक गोष्ट तपासली गेलीच पाहिजे. कंटेंट जेवढा स्वच्छ असेल तो पाहण्यासाठी लोक तेवढीच गर्दीही करतील.”
आणखी वाचा : “मी, शाहरुख, आमिर, अजय, अक्षय मिळून…” नव्या कलाकारांबरोबरच्या स्पर्धेबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य
याबरोबरच चित्रपटातील बोल्ड सीन्स आणि अंगप्रदर्शनाबद्दलही भाईजानने त्याचं मत मांडलं. तो म्हणाला, “मध्यंतरी चित्रपटातही असे प्रकार पाहायला मिळत होते, आता प्रमाण थोडं कमी झालं आहे. आपण भारतात राहतो, आपल्या मर्यादा आपल्याला ध्यानात यायला हव्या. आता हळूहळू लोक चांगल्या कंटेंटकडे वळू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे.” सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’साठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.