Sikandar OTT Release: ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस आला. सलमान खान व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असा अंदाज प्रदर्शनाआधी अनेकांनी लावला. एवढंच नव्हे तर अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडली होती. २ हजारांहून अधिक रुपयांत तिकीट विकली जात होती. त्यामुळे २०२५ मधला सर्वाधिक कमाई करणारा ‘सिकंदर’ चित्रपट ठरेल, असा विश्वास अनेकांना होता. पण तसं काही झालं नाही.
बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची जादू फिकी पडली. २०० कोटींचं बजेट असलेल्या ‘सिकंदर’ने पहिल्या दिवशी फक्त २६ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत किचिंत वाढ झाली. पण चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. ‘सिकंदर’ने चौथ्या दिवशी ९.७५ कोटींचा गल्ला जमवला. तेव्हापासून या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होताना दिसत आहे. सात दिवसांमध्ये ‘सिकंदर’ने फक्त ९७.५० कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील हे चित्र पाहून आता लवकरच ‘सिकंदर’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे.
येत्या काही आठवड्यात ‘सिकंदर’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. माहितीनुसार, ११ मे किंवा २५ मेपासून सलमान खानचा हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे. पण ‘सिकंदर’ चित्रपटाची ओटीटीवर प्रदर्शनाची ही तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही.
दरम्यान, ‘सिकंदर’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खाननं चित्रपटाच्या कमाईबाबत भविष्यवाणी केली होती. सलमान खान म्हणाला होता की, चित्रपट चांगला असो वा वाईट, चाहते १०० कोटी पार करून टाकतात. पण, १०० कोटी ही खूप आधीची गोष्ट आहे, आता २०० कोटींचा व्यवसाय करून देतात. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकले आहेत. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
सलमानचे ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई
‘सिकंदर’ चित्रपटाआधी २०१९ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटानं पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. ४२.३० कोटींचा गल्ला या चित्रपटानं जमवला होता. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी ३६.५४ कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. तसेच याआधी कतरिना कैफ, सलमान खानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटानं पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटानं ३२.९३ कोटींचं कलेक्शन केलं होतं.