सध्या सर्वत्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. सीरिजची कथा, सीन्स, गाणी, कलाकारांचा अभिनय याविषयी चर्चा रंगली आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल प्रमुख भूमिकेत झळकल्या आहेत. ‘हीरामंडी’ हे स्वातंत्र्यापूर्वी बेतलेलं एक नाटक आहे; ज्यामध्ये नवाबांचे जीवन पाहायला मिळते. दोन दशकापासून ही कल्पना संजय लीला भन्साळींच्या डोक्यात होती. जी अखेर पूर्णत्वास आली. सध्या ‘हीरामंडी’च्या मेकिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामधून संजय लीला भन्साळींनी ‘हीरामंडी’चा दुसरा सीझन येणार की नाही? याविषयी भाष्य केलं आहे.
‘आयएमडीबी’च्या युट्यूब चॅनलवर ‘हीरामंडी’चा मेकिंग व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला संजय लीला भन्साळी म्हणाले की, “हा माझा पहिला शो आहे आणि पहिली सीरिज आहे, जी बनवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. १८ वर्षांपासून मी या कथेबरोबर जगत आहे. १४ वर्षांपासून याचं नियोजन करत होतो. ही कथा माझ्याशी जोडली गेलेली आहे. प्रत्येक चित्रपटानंतर ‘हीरामंडी’चा विषय असायचा. हा खूप मोठा प्रोजेक्ट होता. याचा दोन तासांचा चित्रपट बनवणं कठीण होतं. पण अखेर वेळ आली आणि आम्ही याची सीरिज बनवली. कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला न्याय मिळण महत्त्वाचं होतं.”
पुढे वेश्यांबद्दल भन्साळी म्हणाले, “त्या राण्या होत्या पण त्यांच्यामधेही वैयक्तिक वैमनस्य होते. त्यांचं वैयक्तिक सेलिब्रेशन होतं, स्वतःचा आनंद होता, पण दुःख देखील होतं. दरम्यान आम्ही ‘हीरामंडी’च्या सेटवर वातावरण चांगलं ठेवण्यासाठी सतत गाणी लावू ठेवायचो.”
व्हिडीओच्या शेवटी भन्साळी म्हणाले, “हीरामंडी बनवणं हा एक डिमांडिंग प्रोसेस होती आणि हे पुन्हा केलं जाऊ शकत नाही. आम्ही हे बनवलं आहे. हे बनवताना मला खूप मजा आली आणि ईश्वराच्या कृपेने आम्ही ते करून दाखवलं. हा खूप अवघड प्रोजेक्ट होता. त्यामुळे पुन्हा कोणी ‘हीरांमडी’ बनवू शकत नाही. कारण हे एकदाच होतं.” त्यामुळे आता ‘हीरामंडी’च्या दुसऱ्या सीझनच्या चर्चांना भन्साळींच्या या वक्तव्यामुळे पूर्णविराम लागला आहे.