Scam 2003 – The Telgi Story Review: “मेरे को पैसा कमाने का कोई शौक नहीं, पैसा कमाया नहीं, बनाया जाता है.” असं म्हणणाऱ्या अब्दुल करीम तेलगीचा प्रवास ‘स्कॅम २००३ – तेलगी स्टोरी’ या वेबसीरिजमधून उलगडला. या सीरिजचा एक भाग सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला ज्यामुळे तेलगीचं पूर्वायुष्य, त्याची कौटुंबिक बाजू, स्टॅम्प पेपरच्या व्यवसायात त्याने घेतलेली एन्ट्री आणि मग खालच्या शिपायापासून वरच्या मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाला खिशात घालणाऱ्या तेलगीची गोष्ट या पहिल्या भागात मांडली. ‘स्कॅम १९९२’ च्या तुलनेत या सीरिजचे पहिले ४ भाग प्रेक्षकांची पकड घेऊ शकले नाहीत, पण या पहिल्या भागातील पाचव्या एपिसोडने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली. मुंबईतील एका डान्स बारमधील महिलेवर तेलगीने करोडो रुपये उधळल्याने तो अचानक सगळ्यांच्या नजरेत आला आणि तेव्हापासूनच त्याच्या संकटात भर पडायला सुरुवात झाली. याच मुद्द्यावर याचा पहिला भाग संपला होता, आणि तेलगीचा तो टर्निंग पॉइंट प्रेक्षकांसाठी एक धमाकाच होता.

हंसल मेहता यांच्या या सीरिजचा दूसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला असून बारबालेवर पैसे उधळल्यानंतर तेलगीच्या आयुष्यात कशाप्रकारे वादळ आलं ज्यामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पहिल्या भागापेक्षा या सीरिजमधले हे शेवटचे भाग जास्त खिळवून ठेवणारे आहेत असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही. पाहायला गेलं तर हर्षद मेहताने आपल्या यंत्रणेतीलच काही लुपहोल्सच्या माध्यमातून घोटाळा केला परंतु तेलगीने मात्र टेबलाखालील मार्ग अवलंबत ३३००० कोटींचा घोटाळा केला हे अगदी उघड आहे. खासकरून या दुसऱ्या भागात तेलगीच्या एकूणच या घोटाळ्याचा आणि त्याच्या वृत्तीत झालेल्या बदलांचा अगदी अचूक आढावा घेतलेला आहे.

BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया

आणखी वाचा : Shantit Kranti 2 Review : प्रेम, नाती अन् अध्यात्माला दोस्तीची जोड असलेल्या धमाल सीरिजचा नवा सीझन

बारबालेच्या प्रकरणानंतर तेलगीची चर्चा देशभरात व्हायला लागली अन् कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने केलेल्या फिल्म स्टार राजकुमारच्या अपहरणाशी तेलगीचा संबंध जोडला गेला अन् तिथून बेंगलोर, मुंबई व दिल्ली या तीनही राज्यांच्या राजकीय डावपेचात तेलगी कसा भरडला गेला हे या दुसऱ्या भागात दाखवण्यात आलं आहे. याबरोबरच तेलगीचं खासगी आयुष्य, त्यांना झालेले आजार अन् तरी या सगळ्यावर मात करत आपल्याला कुणीही हात लावू शकत नाही हा फोल आत्मविश्वासच तेलगीच्या शेवटास कारणीभूत होता हे या दुसऱ्या भागातून अत्यंत उत्तमरित्या अधोरेखित करण्यात आले. तसेच ज्या वेगाने तेलगी पुढे धावत होता तसं त्याने त्याच्या बरोबरीने चालणाऱ्या लोकांनाही तितकंच दुखावलं. पहिले आपल्या भावाची राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी झटणारा तेलगी हा नंतर इतका स्वार्थी झाला की भाऊ, आई, बायको आणि मुलगी या सगळ्यांनीच त्याच्यापासून फारकत घेतली.

बनावट स्टॅम्प पेपर बनवण्याची कला जरी त्याला अवगत असली तरी केवळ अधिकाऱ्यांना लाच देणाऱ्या, राजकारण्यांना खुश ठेवणाऱ्या तेलगीच्या अंतासाठी त्याच्या याच गोष्टी कारणीभूत ठरल्या. या सगळ्या गोष्टी सीरिजच्या कथा आणि पटकथेत अगदी उत्तमरित्या बांधलेल्या आहेत. याबरोबरच करण व्यास आणि किरण यज्ञोपवित यांनी लिहिलेल्या प्रभावी आणि विचार करायला लावणाऱ्या संवादांमुळे सीरिजची रंगत आणखी वाढली आहे. खासकरून सीरिजच्या शेवटाला जेव्हा तेलगी त्याच्या शिक्षणाचा संबंध आणि त्यातून होणारा फायदा याबद्दल बोलतो तेव्हा काही क्षण तरी त्याच्याबद्दल सहानुभूति मनात निर्माण होते. याबरोबरच “मी कोणत्याही सामान्य माणसाला लुबाडलं” हा त्याचा अॅटीट्यूड मात्र चांगलाच खटकतो. तेलगीने जरी लोकांना थेट लुबाडलं नसलं तरी त्याच्या या स्कॅममुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि एकूणच देशाच्या सर्वांगीण विकासाला ब्रेक लागला जे लोकांच्या आर्थिक नुकसानापेक्षा फार भयंकर आहे. हेच या सीरिजच्या शेवटातून अधोरेखित करण्यात आलं आहे.

ज्याप्रमाणे ‘स्कॅम १९९२’मध्ये हर्षद मेहता व त्याच्या घोटाळ्याचं महिमामंडन करण्यात आलं तसं ‘स्कॅम २००३’ मध्ये तुम्हाला क्वचितच आढळून येईल. शेवटी अर्थात ही एक मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून बनवलेली सीरिज असल्याने तेवढं स्वातंत्र्य आपण लेखक आणि दिग्दर्शकाला दिलंच पाहिजे. सगळ्याच एपिसोडचं आणि खासकरून या नव्या भागातील शेवटच्या ५ एपिसोडचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी उत्तमरित्या केलेलं आहे. कथानकातील प्रत्येक पात्राला योग्य न्याय देण्यात आलेला असून मुकेश तिवारी, इरावती हर्षे, अमन वर्मा, नंदू माधव, सना अमिन शेख, विद्याधर जोशी यांची कामं अत्यंत चोख आणि उल्लेखनीय अशी झाली आहेत.

गगनदेव रियार हे तर या शेवटच्या ५ एपिसोडमध्ये अब्दुल करीम तेलगी हे पात्र जगले आहेत. आपल्या आईच्या कबरीवर येऊन लोरी गाण्याचा सीन पाहताना तुम्ही त्या अभिनेत्याला विसरता इतकं जबरदस्त काम गगनदेव यांनी केलं आहे. देहबोलीपासून चालण्याची लकब हे अगदी हुबेहूब गगनदेव यांनी आपल्यासमोर सादर केलं आहे, त्याहीपलीकडे जाऊन तेलगीच्या खासगी आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावेळी गगनदेव यांची अदाकारी मनाला भिडणारी अशीच आहे. बाकी पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी सगळीच भट्टी उत्तम जमून आली आहे. पहिले पाच एपिसोड हे फारसे रंजक नसले तरी या शेवटच्या पाच एपिसोडसाठी तुम्ही ही सीरिज पूर्णपणे बघायला काहीच हरकत नाही.