‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व सध्या चर्चांचा भाग बनले आहे. अनिल कपूर सूत्रसंचालन करत असलेल्या या तिसऱ्या पर्वाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बिग बॉसने स्पर्धकांना दिलेल्या टास्कमुळे, कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे तर कधी घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे पर्व चर्चेत असल्याचे दिसते. आता मात्र वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित नंतर आणखी एक सदस्य घराबाहेर पडल्याने ‘बिग बॉस ओटीटी’चे हे पर्व चर्चेत आले आहे.
जेष्ठ पत्रकार दीपक चौरसिया हे घरातून बाहेर पडले आहेत. त्यांनी बिग बॉसच्या घरात कमी योगदान दिल्याचे मत अनेक सदस्यांनी मांडले आहे. दीपक चौरसिया यांच्यासाठी बिग बॉसने काही खास टास्क आयोजित केले होते. मात्र दीपक चौरसिया त्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. दुर्देवाने त्यांच्या दुखापतीमुळे ते यामध्ये टास्कमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. असे काहींनी मत मांडले आहे. तर काहींनी दीपक चौरसिया हे जरी टास्कमध्ये सहभागी होत नसले तरी त्यांनी संपूर्ण घर आपल्या मर्जीप्रमाणे चालवले असल्याचे म्हटले आहे. ते मास्टरमाईंड असून लोकांची मने वळवण्याची कला त्यांच्याकडे असल्याचे मत काही सदस्यांनी मांडले आहे.
हेही वाचा: वाळू माफियांनी मला जवळपास बदडून काढलं होतं; विकी कौशलने ‘गँग्स ऑफ वासेपूर’वेळचा सांगितला किस्सा
दीपक चौरसिया यांनी घरात त्यांचे करिअर आणि पत्रकारितेतील अनेक गोष्टी इतर सदस्यांबरोबर शेअर केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी घरात जाण्याआधी ‘दी इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, अनेक मोठ्या लोकांची रहस्यांचा उलगडा करेन, असा दावा केला होता. मात्र घरात अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले नाही. त्यामुळे त्यांनी केलेला दावा ते पूर्ण करू शकत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी माझ्या आतमध्ये अनेक गोष्टी लपवू शकतो. पत्रकारितेत आल्यापासून या ३१ वर्षात माझ्याकडे अनेकांची अनेक रहस्ये आहेत, जी आजपर्यंत उघड केली नाहीत. ती जर मी उघड केली तर खूप मोठ्या लोकांना अडचण येईल. मी ज्या गोष्टी बोलेन, त्यामुळे अनेक विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मी जगाला सांगेन की गोष्ट कशी तयार होते आणि त्या गोष्टीमागे तथ्य काय आहेत. येत्या काही आठवड्यात मी रोज एक नवीन गोष्ट शेअर करेन. असे मुलाखतीदरम्यान दीपक चौरसिया यांनी म्हटले होते, मात्र तसे घडताना दिसले नाही. बिग बॉसच्या घरात दीपक चौरसिया यांचे सर्व स्पर्धकांबरोबर चांगले संबंध होते. मात्र वाइल्ड कार्ड स्पर्धक अदनान शेखबरोबर त्यांचे मोठे भांडण झालेले पाहायला मिळाले होते.
आता बिग बॉसचा हा सीझन जसा पुढे जात आहे, तशी प्रेक्षकांची पुढे काय होईल याची उत्सुकता वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकत बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे, हे महत्वाचे ठरणार आहे.