अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिदचा हटके अंदाज दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल आणि या चित्रपटातील शाहिदच्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. यांपैकीच एक म्हणजे शाहिदने या चित्रपटासाठी घेतलेले मानधन. आता शाहिदने स्वतः याबाबत एक खुलासा केला आहे.
शाहिद कपूरचा आगामी ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात संजय कपूर, डायना पेंटी, रोनित रॉय आणि राजीव खंडेलवाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटासाठी त्याने ४० कोटी मानधन आकारले असल्याचे बोलले जाऊ लागले. आता स्वतः शाहिदने याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : Video: मीराला बघताच शाहिद कपूरमधील कबीर सिंग झाला जागा; त्रासलेली पत्नी म्हणाली…
या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एका रिपोर्टरने शाहिदला त्याच्या मानधनाबाबत प्रश्न विचारला. या चित्रपटासाठी तू ४० कोटी फी घेतलीस हे खरे आहे का? असे विचारताच शाहिदने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, “मला इतकं मानधन द्या. तुम्ही जर मला तुमच्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी इतकी रक्कम दिली तर मी तुमचेही चित्रपट करेन.” यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर मस्करीत म्हणाले, “तू कमी रक्कम सांगितलीस.”
दरम्यान, शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट ९ जून रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहून शाहिदचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक झालेले पाहायला मिळत आहेत.