Deva OTT Release : कधी ‘राजीव माथूर’, कधी ‘आदित्य कश्यप’, तर कधी ‘कबीर सिंग’च्या रूपातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शाहिद कपूर अलीकडेच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला. ‘देवा’ चित्रपटातून पुन्हा एकदा शाहिद डॅशिंग अंदाजात दिसला. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘देवा’ चित्रपटानं ५.५ कोटींची कमाई केली होती. आता ‘देवा’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. तो कधी, कुठे प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

शाहिद कपूरचा ‘देवा’ चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बऱ्याच दिवसांनंतर शाहिदचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता, जो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. पण, शाहिदच्या ‘देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. माहितीनुसार, ५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं जागतिक स्तरावर ५१.७३ कोटींची कमाई केली; तर भारतात फक्त ३७.८६ कोटींचा गल्ला जमवला. आता शाहिदचा ‘देवा’ चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.

‘देवा’ चित्रपट आज २८ मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमिंग होत आहे. नेटफ्लिक्सवर शाहिदचा हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट पाहता येणार आहे. शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लोकप्रिय मल्याळम दिग्दर्शक रोशन अ‍ॅण्ड्रयुज यांनी केलं होतं. झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित ‘देवा’ चित्रपटात शाहिद पोलीस अधिकारी देव अंब्रेच्या भूमिकेत झळकला आहे. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याशिवाय ‘देवा’मध्ये कुबरा सैत आणि पवेल गुलाटीसह बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.

दरम्यान, शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो याआधी ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ चित्रपटात पाहायला मिळाला होता. या चित्रपटात शाहिद क्रिती सेनॉनबरोबर झळकला होता. शाहिदच्या या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. आता लवकरच तो ‘फर्जी २’ वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. शाहिदच्या ‘फर्जी’ सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘फर्जी २’ सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. सध्या शाहिद विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचं नाव ‘अर्जुन उस्तरा’ असं असून, त्यामध्ये शाहिद अभिनेत्री तृप्ती डिमरीसह पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.