Farzi Web series Review : “ना बिवी ना बच्चा, ना बाप बडा ना भैय्या, द व्होल थिंग इज दॅट के सबसे बडा रुपैया.” अभिषेक बच्चनच्या ‘ब्लफमास्टर’ चित्रपटातील हे गाणं आपल्याला एवढं कनेक्ट का होतं, हे प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेली नवी ‘फर्जी’ ही वेबसीरिज बघितल्यावर स्पष्ट होतं. अगदी हीच गोष्ट कथानकाच्या केंद्रबिंदूपाशी ठेवून त्याभोवती जे लाजवाब कथानक रचण्यात आलं आहे त्यासाठी या सीरिजचे निर्माते राज आणि डीके यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. डिसी किंवा मार्वलसारखं युनिव्हर्स तयार करायचं असेल तर ते यश राजच्या ‘टायगर’ किंवा ‘पठाणकडून नव्हे तर या दोन हरहुन्नरी दिग्दर्शकांकडून शिकावं.

काउंटरफिट करन्सी म्हणजेच खोट्या चलनातील नोटा ही गोष्ट आजवर आपण बऱ्याच चित्रपटात केवळ तोंडी लावण्यापुरती ऐकली किंवा पाहिली आहे. ‘फर्जी’मधून याच गोष्टीभोवती एक थरारक कथानक तयार करून या खोट्या चलनी नोटांचं रॅकेट, त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, यातील डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क, राजकारण आणि सरकारी यंत्रणेचा सहभाग या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने आपल्यापुढे मांडल्या आहेत कि ते पाहताना आपण अक्षरशः अवाक होतो. माझ्या पाहण्यात तरी असं कथानक आजवर आपल्याकडे सादर झालेलं नाही. गुन्हेगारी विश्वावरील विषयांमध्ये आजवर बरेच प्रयोग झाले आहेत पण काउंटरफिट करन्सीसारख्या गंभीर समस्येबद्दल आजवर कधीच आपण एवढं विस्तृत कथानक पाहिलेलं नाही.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

आणखी वाचा : ‘गदर २’मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका; किंग खानच्या ‘पठाण’मध्येही केलंय काम

ही कथा आहे सनी (शाहिद कपूर) नावाच्या एका कलाकाराची जो एक पेंटर आहे आणि त्याच्या आईच्या वडिलांबरोबर म्हणजेच आजोबांच्या घरीच तो लहानाचा मोठा झालेला आहे. त्याचा भूतकाळ, त्याच्या आई वडिलांनी त्याला वाऱ्यावर सोडणं, मग आजोबांनी त्याला लहानाचं मोठं करणं, आजोबा एका ‘क्रांति पत्रिका’ नावाच्या मुखपत्रिकेचे संपादक असणं, कर्जामुळे त्यांच्या प्रिंटिंग प्रेसवर जप्ती येणं आणि मग यातून बाहेर पडण्यासाठी सनीची धडपड या सगळ्या गोष्टी खूप प्रभावीरित्या यातून मांडल्या आहेत. आजोबांची प्रेस वाचवण्यासाठी आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी सनी त्याच्यातील कलेचा वापर करतो आणि खोट्या नोटा बनवायला सुरुवात करतो आणि पुढचा त्याचा प्रवास नेमका कुठे जाऊन थांबतो हे आपल्याला या ८ भागांच्या सीरिजमध्ये समजतं.

सनीच्या कथानकाशी अगदी समांतर मायकल (विजय सेतुपती) आणि मेघा (राशी खन्ना) या दोघांचं कथानकही तितकंच थरारक आणि गुंतागुंतीचं आहे. या दोघांचं सरकारद्वारा स्थापित अॅंटी काउंटरफिट करन्सी डिपार्टमेंटमधलं काम आणि खोट्या चलनी नोटांचं हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी उचललेला विडा यामागेसुद्धा एक उत्तम भूतकाळ यात मांडला आहे. खरं बघायला गेलं तर हा चोर पोलिसाचा नेहमीचाच खेळ आहे पण या खेळात काउंटरफिट करन्सी ही गोष्ट ज्यापद्धतीने उलगडली गेली आहे तोच या वेबसीरिजचा सर्वात मोठा आकर्षक मुद्दा आहे.

वरवर जरी ही एक क्राइम थ्रिलर वेबसीरिज वाटत असली तरी यात मानवी मूल्य, सामाजिक जबाबदारी, आर्थिक विषमता, यंत्रणेचा फोलपणा, कौटुंबिक मूल्य, गुन्हेगारी विश्वातील दलदल हे सगळं खूप उत्तमरित्या या कथानकात पेरलं आहे. यामुळेच कदाचित ही सीरिज तुम्हाला एक क्राइम थ्रिलरहून कित्येक पटीने वेगळा अनुभव देते. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी या सीरिजमध्ये फार कमी शिव्यांचा वापर केलेला आहे, एखाद दोन कीसिंग सीन्स आहेत. हे वगळता पूर्णपणे ही वेबसीरिज त्याच्या कथानकाशी प्रामाणिक राहते आणि कुठेही आपला ट्रॅक सोडत नाही. सीरिजमध्ये एक लव्ह अॅंगलदेखील आहे पण तो केवळ कथानक पुढे नेण्यासाठीच वापरण्यात आला आहे.

कथेबरोबरच पटकथा आणि संवाद हे या वेबसीरिजचे आणखी प्लस पॉइंट आहेत. अशाप्रकारच्या सीरिजसाठी तुमची पटकथेवर चांगली पकड असणं आवश्यक असतं. फर्जीच्या बाबतीत हीच गोष्ट उत्तम जमून आल्याने तब्बल ५० मिनिटं ते १ तासांचे असे ८ भाग कुठेही तुम्हाला रटाळ वाटत नाहीत. याबरोबरच अॅक्शन सीन्स आणि दमदार डायलॉगबाजी यामुळे आपला या वेबसीरिजमधला इंट्रेस्ट अधिकच वाढतो. कुठेही जड संवाद घुसडून ही वेबसीरिज रटाळ न करता योग्य तिथे विनोदाची फोडणी आणि ‘बंबईया भाषेचा’ योग्य वापर यामुळे वेबसीरिज अधिक लोकांच्या जवळची होते. “हमने इस दुनियाके सबसे बडे इमानदार आदमी की फोटो सबसे बडी कमिनी चीजपे छाप दी” वेबसीरिजच्या सुरुवातीलाच शाहिद कपूरच्या तोंडचा हा संवाद आणि पुढे येणारे असेच जबरदस्त डायलॉग तुमचं मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडत नाहीत.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज आणि डीके यांनी यामध्ये अलगद सोडलेले ‘द फॅमिली मॅन’या वेबसीरिजचे रेफरन्स. यामुळे ही वेबसीरिज आणखी महत्त्वाची बनलेली आहे हे तुम्हाला सिरिज बघतानाच कळेल. बाकी यातील संगीत, चित्रीकरण, संकलन यापैकी कशातही खोट काढू शकत नाही. सगळ्याच बाबतीत ही वेबसीरिज अव्वल आहे. शाहिद कपूरला या वेबसीरिजसाठी उत्कृष्ट ओटीटी पदार्पणाचा पुरस्कार नक्कीच मिळायला हवा इतकं सहज त्याने काम केलं आहे, कुठेही त्याने त्याचा मोठ्या पडद्यावरचा औरा आड येऊ दिलेला नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट, बाकी स्टाईल स्वॅगच्या बाबतीत शाहिद आहेच अव्वल आणि यातही त्याने पुन्हा स्वतःला सिद्ध केलं आहे. अमोल पालेकर आणि भुवन अरोरा या दोघांनी शाहिदबरोबर तोडीस तोड काम केलं आहे.

विजय सेतुपती आणि के के मेनन या दिग्गज मंडळींचा केवळ स्क्रीनवरचा वावरसुद्धा खूप काही शिकवून जातो. यातील या दोघांची पात्रं ज्यापद्धतीने लिहिली गेली आहेत आणि त्यांनी यात जे जीव ओतून काम केलंय त्याला खरंच शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. या दोघांच्या पात्रांवर एक स्वतंत्र स्पिन ऑफ सिरिजदेखील तयार होऊ शकते एवढी ही पात्रं सशक्त आहेत. बाकी राशी खन्ना, झाकीर हुसेन, नीलेश दिवेकर, चित्तरंजन गिरी आणि इतरही सगळ्या सहकलाकरांनी अप्रतिम साथ दिली आहे. पैसा हा देवासमान नाही, पण तो देवापेक्षा कमीही नाही ही गोष्ट शाहिदच्या पात्राच्या तोंडी ऐकताना आपणही काही सेकंद त्याने केलेल्या गुन्ह्याला माफ करून मोकळे होतो. एकूणच हे संपूर्ण जग केवळ एकाच गोष्टीमागे धावतंय ते म्हणजे पैसा. त्यासाठी सनीसारखी काही लोक या गुन्हेगारीच्या मार्गाला लागतात आणि हळूहळू या दलदलीत अडकत जातात आणि मग या खोट्या नोटांप्रमाणेच तेसुद्धा ‘फर्जी’ बनतात हेच या वेबसीरिजमधून मांडायचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच दिवसांनी ओटीटीवर एक खिळवून ठेवणारं, उत्कृष्ट आणि समाधानकारक असं काहीतरी बघायला मिळालं आहे तर ही सीरिज अजिबात चुकवू नका.