बॉलीवूड स्टार्सबरोबरच त्यांची मुलंही खूप चर्चेत असतात. अद्यापही मनोरंजन क्षेत्रात ती आलेली नसली तरीही अनेकांचं फॉलोइंग खूप मोठं आहे. यातीलच एक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. त्याच्या कृतीमुळे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. आता त्याच्या मनोरंजनसृष्टीतील पदार्पणावरून तो चर्चेत आला आहे.
आर्यनच्या बॉलीवूड पदार्पणामुळे काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात नाही तर लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात तो त्याचं नशीब आजमावणार आहे. गेले अनेक दिवस त्याच्या पहिल्या प्रोजेक्टची चर्चा रंगली होती. आता यात कोण कोण कलाकार दिसणार, हे समोर आलं आहे.
आर्यन दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या या वेब सीरिजचं नाव ‘स्टारडम’ असं असेल. या सीरिजचे एकूण सहा भाग प्रदर्शित होतील. यामध्ये शाहरुख खानबरोबरच बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. या सीरिजमध्ये अभिनेते राम कपूर यांची पत्नी गौतमी कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याचबरोबर रणवीर सिंगही या सीरिजमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. शाहरुख खान आणि रणवीर सिंग वेगवेगळ्या भागांमध्ये दिसतील आणि त्यांची भूमिका कथानकाला पुढे नेणारी असेल, असंही म्हटलं जात आहे.
आर्यन खानची ही आगामी सीरिज मुंबईमध्ये आपलं नशीब आजमावायला आलेल्या डबिंग आर्टिस्टची गोष्ट असेल. यामध्ये त्यांच्या खासगी आणि लव्ह लाइफचीही झलक पाहायला मिळेल. अद्यापही या सीरिजची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आर्यन खानची ही पहिलीवहिली वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.