Shantit Kranti 2 Review : भारतात ओटीटीचे आद्य प्रवर्तक कोण असा प्रश्न विचारायचं झालं तर आपल्यासमोर नाव येतं ते म्हणजे ‘टीव्हीएफ’ या बड्या ब्रॅंडचं. डिजिटल युगातील क्रांति खरी ‘द व्हायरल फिव्हर’मुळेच सुरू झाली अन् त्यामुळेच आज या ओटीटी विश्वाच्या सागरात प्रत्येक भारतीय प्रेक्षक मनसोक्त डुबक्या मारतोय. याच ‘टीव्हीएफ’च्या सहाय्याने ‘भाडीपा’सारख्या मोठ्या ब्रॅंडने आज एका मराठी वेब विश्वात खरंच ‘शांतीत क्रांती’ केलीये असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. यामागील कारण फार महत्त्वाचं आहे ते म्हणजे आज ओटीटी प्लॅटफॉर्म हे एकप्रकारचं डम्पिंग ग्राऊंड झालं आहे जिथे सतत हिंसा, रक्तपात, शिवीगाळ, नग्नता, गुन्हेगारी विश्व याच काही मोजक्या विषयांवर आधारित चित्रपट किंवा वेब सीरिज पाहायला मिळतात. अशा एकूणच वातावरणात हिंदीत ‘टीव्हीएफ’ने जे ‘पंचायत’ किंवा ‘कोटा फॅक्टरी’सारख्या वेब सीरिजच्या माध्यमातून करून दाखवलं तेच ‘भाडीपा’ने ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजमधून करून दाखवलं आहे.
नुकताच ‘शांतीत क्रांती’चा दूसरा सीझन सोनी लीव्हवर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या सीझनप्रमाणे हा सीझन काही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक सफरीवर घेऊन जात नाही, पण अध्यात्म हे रोजच्या जगण्यातूनही अनुभवता येतं किंबहुना ते तसंच अनुभवायचं असतं हे या दुसऱ्या सीझनमधून अगदी उत्तमरित्या दाखवण्यात आलं आहे. ‘शांतिवन’ मधून बाहेर पडल्यावर तब्बल १८ महिन्यांनी लहानपणीचे अगदी जीवश्च् कंठश्च मित्र श्रेयस, दीनार व प्रसन्न हे पुन्हा एकत्र भेटतात, पण यावेळी प्रत्येकाच्या आयुष्यात फार मोठे बदल घडलेलेही आपल्याला पाहायला मिळतात.
तिघे भेटल्यावर आपआपल्या आयुष्यात घडलेल्या या आमूलाग्र बदलांविषयी गप्पा मारतात अन् मजबूत दारू पितात, अन् पहिल्या सीझनमध्ये जसे ते पुढच्या दिवशी उठून गोव्याला जायला निघतात अन् शांतिवनमध्ये पोहोचतात तसंच या सीझनमध्ये हे तिघे एका भक्तीयात्रेत सामील होतात. अर्थात आता पुढे त्यांचं काय होतं? या यात्रेतून त्यांना त्यांच्या आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का? पुन्हा परिस्थिती मूळ पदावरच येते का? ते तिघे या यात्रेत कुणामुळे येतात? अन् महाराष्ट्र ते नेपाळ या प्रवासादरम्यान त्यांना जे हवंय ते मिळतं की नाही? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सीरिज पाहिल्यावर मिळतील.
एकंदरच ही संपूर्ण सीरिज जरी तीन मित्रांच्या अतूट मैत्रीवर बेतलेली जरी असली तरी यामध्ये त्यांचा भूतकाळ वर्तमानकाळातील संघर्ष, त्यांच्या मनात असलेली द्वंद्व, कौटुंबिक जबाबदऱ्या, करीयरची चिंता या सगळ्या गोष्टींच्या रोलर कोस्टर राईड मधून तुम्हाला ही सीरिज घेऊन जाते. हे सगळं सुरू असताना आध्यात्मिक डोससुद्धा ही सीरिज देते पण ते कुठेच ठरवून केलंय किंवा लिखाणात ते जाणून बुजून आलंय असं जाणवत नाही. या दुसऱ्या सीझनची जी टॅगलाईन आहे ‘लाईफ ईज एंजॉय’ या लाईनला अगदी धरूनच सीरिज चालते.
उत्कृष्ट बॅकग्राउंड म्युझिक, डोळ्यांना एक वेगळंच समाधान देणारी सिनेमॅटोग्राफी, कुठेही जड न वाटणारे पण अगदी मोजक्या शब्दात जे सांगायचंय ते अचूक मांडणारे संवाद, आजच्या जनरेशनला कनेक्ट होतील अशी पात्र, ‘दिल चाहता है’ व ‘द हँगओव्हर’सारख्या अजरामर चित्रपटांचे संदर्भ, अत्यंत वेगवान पटकथा व या सगळ्यांच्या जोडीला प्रत्येक कलाकाराचा अप्रतिम अभिनय यामुळे हा दूसरा सीझन आणखी भावतो.
पहिल्या सीझनच्या तुलनेत हा दूसरा सीझन बराच प्रॅक्टिकल वाटतो त्यामुळे पहिला सीझन संपल्यावर जी शांतता डोक्यात, हृदयात जाणवत होती तशी हा दुसरा सीझन पाहताना जाणवत नाही, पण हा दूसरा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच पोट धरून हसवतो, तर कित्येक ठिकाणी भावुकही करतो. या सीरिजचा पहिला सीझन अध्यात्म, ध्यानधारणा किंवा मनःशांती म्हणजे नेमकं काय याची आपल्या पिढीला ओळख करून देतो तर दुसऱ्या सीझनमध्ये या गोष्टींची प्रॅक्टिस दैनंदिन जीवनातही कशी करावी हे आपल्याला दर्शवून देतो. ३५ ते ४५ मिनिटांचे पाच एपिसोड तुम्हाला काहीतरी वेगळी, हटके अन् खरोखर दर्जेदार गोष्ट अनुभवल्याचा आनंद देतात.
‘भाडीपा’चे शिलेदार सारंग साठ्ये व पॉला मॅकग्लिन यांनी अत्यंत हुशारीने या सीझनचं लिखाण व दिग्दर्शन केलं आहे. खरंतर पहिल्या सीझनला मिळालेलं यश पाहता त्यांना हा सीझन आणखी गुंतागुंतीचा, लांबलेला करता आला असता, पण तरी त्यांनी अत्यंत आटोपशीर कथानक, जबरदस्त पटकथा आणि आजच्या प्रेक्षकांना कनेक्ट होणारे संवाद यांच्या माध्यमातून हा सीझन अधिक उठावदार केला आहे. याबरोबरच सगळ्या कलाकारांची कामंदेखील अप्रतिम झाली आहेत. अभय महाजन, ललित प्रभाकर व आलोक राजवाडे या तिघांनी उत्तम काम केलंच आहे, खासकरून आलोक राजवाडेचं दीनार हे पात्र या सीझनमध्ये आपल्याला सर्वात जास्त भीडतं अन् आलोकनेही त्या पात्राच्या या वेगळ्याच प्रवासासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. अभय महाजनचा साधेपणा, अभिनयातील सच्चेपणा व निरागसता भाव खाऊन जाते, ललित प्रभाकरचा हटके अंदाज अन् थोडी फिल्मी स्टाइल यात वेगळी जान भरते.
याबरोबरच मृण्मयी गोडबोले आणि प्रियदर्शनी इंदलकर यांची कामंदेखील चोख झाली आहेत. प्रियदर्शनीला या अशा वेगळ्या भूमिकांमध्ये पाहणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे. इतरही सहकलाकारांनी उत्तम साथ दिली आहे अन् यामुळेच हा दूसरा सीझन पहिल्यापेक्षा काही बाबतीत कमी पडला असला तरी तुमच्या अस्वस्थ व चंचल मनाला ताळ्यावर आणण्यात यशस्वी ठरतो हे मात्र नक्की. आधी म्हंटलं त्याप्रमाणे ओटीटीवर सध्या इतक्या विचित्र गोष्टींची गर्दी झालीये की त्या गर्दीत ‘शांतीत क्रांति’सारखी वेब सीरिज हा एक अविस्मरणीय असा सुखद अनुभव आहे अन् खासकरून आजच्या पिढीने तर या सीरिजचा आस्वाद घ्यायलाच हवा.