ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या गेले काही दिवस खूपच चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट ‘गुलमोहर.’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्या अनेक मुलाखती देत आहे. त्यांनी त्यांची नात सारा अली खान तिच्याबरोबर एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.
शर्मिला टागोर यांचा ‘गुलमोहर’ चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तर शर्मिला टागोर यांची नात अभिनेत्री सारा अली खानचा ‘गॅसलाइट’ सिनेमा ३१ मार्च रोजी याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने आजी-नातीच्या जोडीला एकत्र बोलवण्यात आलं होतं.
आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल
मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, “प्रेमामध्ये तुम्ही केलेला सर्वात मोठा वेडेपणा कोणता?” या प्रश्नाचे उत्तर देताना शर्मिला टागोर म्हणाल्या, “अनेक वर्षांपूर्वी मी पनवेलमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होते. एक दिवस काही कारणाने माझं पॅकअप लवकर झालं. तेव्हा माझ्या डोक्यात पहिली ही गोष्ट आली की मी माझे पती मन्सूर अली खान पतौडी यांना विमानतळावर निरोप देण्यासाठी जायला हवं कारण ते बाहेरगावी जात होते. मी त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर पोहोचले तेव्हा ते मला म्हणाले की, तूही माझ्याबरोबर चल. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याबरोबर येण्यासाठी त्यांना होकार दिला.”
हेही वाचा : “मी तुझं मत विचारलेलं नाही…” भर मुलाखतीत शर्मिला टागोर व नात सारा आली खान यांच्यात वाद
पुढे त्या म्हणाल्या, “त्या क्षणी माझ्याकडे माझे कपडे, मेकअपचं माझं सामान, इतकंच नाही तर साधा टूथब्रशही नव्हता. मी सामान न घेताच ती फ्लाईट पकडली होती. पण मग मला त्या अचानक ठरवलेल्या ट्रिपमध्ये खूप मजा येऊ लागली. तेव्हा मला माझ्या पतीचे शॉर्ट्स आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा शर्ट परिधान करावा लागला.”
आजीचं हे बोलणं ऐकून सारा देखील आश्चर्यचकित झाली. तिने देखील हा किस्सा पहिल्यांदाच ऐकला. आता त्यांची ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे.