संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ ही वेब सीरिज रीलिज झाल्यापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. मग गजगामिनीची चाल असो किंवा शर्मीन सेगलचा अभिनय असो, प्रेक्षकांनी यावर भरभरून प्रतिसाद दिला आहे.

अभिनेत्री शर्मीन सेगलने हीरामंडीमध्ये आलमजेबची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर तिच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली तसेच अनेक मीम्सदेखील तिच्यावर बनवले गेले.

महिन्याभराच्या ट्रोलिंगनंतर आता शर्मीनने यावर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मीनने प्रेक्षकांच्या मताबद्दल तिचा दृष्टिकोण कसा आहे याबद्दल सांगितलं.

हेही वाचा… दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरी राहायला आली अदा शर्मा; म्हणाली, “मला सकारात्मक…”

न्यूज १८ शोशाला दिलेल्या मुलाखतीत शर्मीन म्हणाली, “मी आलमजेब या भूमिकेसाठी माझं सर्वस्व दिलं. आपण नेहमी नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो परंतु अनेक सकारात्मक गोष्टीदेखील आहेत ज्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. सकारात्मक गोष्टींबद्दल बोलणं कदाचित पुरेसे मनोरंजक नसेल, म्हणून मी काही प्रमाणात त्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देते.”

शर्मीन पुढे म्हणाली, “असा एक वेळ होता जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे (ट्रोलिंगकडे) दुर्लक्ष केलं. पण नंतर हळूहळू मला समजलं की मला जे काही प्रेम मिळतंय तेदेखील मी गमावतेय. आता मी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरूवात केलीय. गेल्या काही दिवसांपासून मी या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोणातून पाहू लागलीय. शेवटी प्रेक्षकांचं मत कदाचित तुम्हाला सर्वोत्तम बनण्यासाठी मदत करेल.”

हेही वाचा… सुजलेला चेहरा, बोटॉक्स अन्.., दर दुसऱ्या दिवशी उर्फीला होते अ‍ॅलर्जी, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली, “मला फक्त सहानुभूती…”

याआधी शर्मीनची बाजू घेत संजय लीला भन्साळी यांनी इंडिया टुडेला सांगितलं होतं की, “शर्मीनकडे आलमजेबचा चेहरा आहे, जिला तवायफ बनायचं नाही असा चेहरा तिचा आहे. आम्हाला अगदी निरागस दिसणारी, तवायफसारखी न बोलणारी कोणीतरी हवी होती. शर्मीनच्या भूमिकेला कविता लिहिण्याच्या इच्छेने काहीसे मुक्त व्हायचे असते. ही गोष्ट समोर येताच मी आलमजेबसाठी शर्मीनची निवड केली.

दरम्यान, ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये अदिती राव हैदरीसह मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजीदा शेख, फरदीन खान, ताहा शाह आदी कलाकार आहेत.