अभिनेते शेखर सुमन यांनी संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. यात त्यांनी मल्लिकाजानच्या भूमिकेत असलेल्या मनीषा कोईरालाबरोबर एक ओरल सेक्स सीन केला आहे. या सीनबद्दल शेखर यांनी खुलासा केला आहे. हा सीन शूट केला, त्या दिवशी काय शूट केलं होतं हे पत्नीला सांगू शकलो नाही, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत शेखर म्हणाले, “प्रेक्षक हळुहळू या दृश्यात असलेली व्यथा समजू लागले आहेत. यात नवाबची स्थिती बिकट झाली आहे आणि त्याचं साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेल्याने तो त्याचं सामाजिक स्थान गमावू लागला आहे. त्याचं आर्थिक नुकसानही होत आहे. लोकांना हळूहळू हा सीन समजत आहे आणि ते या सीनचं कौतुक करत आहेत. कारण यात नवाबची व्यथा दडली आहे. त्याच्यावर काय परिस्थिती ओढवलीये, ते त्यातून दिसतंय. ही परिस्थिती थोडी ब्रिटिशांनी तयार केली आहे तर थोडी तवायफांनी तयार केली असून तो या सर्वांच्या मध्ये अडकला आहे,” असं शेखर सुमन म्हणाले.
ओरल सेक्स सीनबद्दल शेखर म्हणाले की हा सीन शूट केला त्यादिवशी पत्नी अल्काला सेटवर काय शूट केलंय ते सांगू शकले नव्हते. “मी काय करत आहे हे मी माझ्या पत्नीलाही सांगू शकलो नाही. जेव्हा मी शूटिंगवरून परत आलो तेव्हा ती म्हणाली तू एक सीन शूट केला आहेस पण तू मला त्याबद्दल सांगत नाहियेस. मी म्हणालो, ‘तो सांगण्यासारखा अजिबात नाही आणि करून दाखवण्यालायक तर अजिबातच नाही. त्यामुळे तो तू सीरिज आल्यावर बघ,'” असं शेखर सुमन म्हणाले.
शेखर सुमन यांनी साकारलेल्या नवाब या व्यक्तिरेखेच्या मानसिक स्थितीबद्दलही सांगितलं. “मल्लिकाजानकडून आपलं शोषण होत आहे, याची त्याला जाणीव होती. ब्रिटीशांच्या बाजूने राहण्यासाठी त्याला त्याच्या नवाबी थाटापासून दूर जावं लागेल याची जाणीव त्याला होती. तसेच आपल्या शारीरिक गरजेपोटी किंवा आपल्या वासनेसाठी आपल्याला नवाब म्हणून असलेला दर्जा सोडून मद्यधुंद अवस्थेत इकडे तिकडे रस्त्यावर कुठेतरी पडून राहावं लागेल याची त्याला जाणीव होती,” असं शेखर सुमन त्या पात्राबद्दल म्हणाले.
शेखर सुमन यांनी सांगितलं की भन्साळींना शूटिंगच्या दिवशी हा सीन अशाप्रकारे करण्याची कल्पना सुचली. हा सीन करण्यात कंफर्टेबल आहेस का, असंही त्यांनी विचारलं होतं. हा सीन केल्यावर भन्साळींनी सर्वांसमोर कौतुक केलं होतं, असंही शेखर सुमन म्हणाले.