Made In Heaven 2 Trailer : प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने नुकताच त्यांच्या बहुचर्चित ‘मेड इन हेवन’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या शोमध्ये परंपरा, आधुनिक विचार, समाजाच्या श्रद्धा आणि भव्य विवाहसोहळ्यांमध्ये गुंतलेले लोक यांच्यातील वैचारिक व मानसिक संघर्षाचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे. शोमध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सरभ, कल्की कोचलिन आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
ट्रेलरमधून पहिल्या सीझनच्या शेवटापासूनच या दुसऱ्या सीझनची सुरुवात होते हे स्पष्ट होत आहे. शिवाय एका वेडिंग प्लॅनरच्या खासगी आयुष्यातील चढ-उतार आणि नव्या सीझनमधील नव्या जोडप्यांच्या आयुष्यातील समस्या अशी सगळी सरमिसळ आपल्याला या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. याबरोबरच मानवी नातेसंबंध आणि लग्नसंस्थेकडे पाहायचा लोकांचा दृष्टिकोन यावरही सीरिज प्रकाश टाकते.
आणखी वाचा : “समाज निर्विष करू या..” महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक सचिन गोस्वामी यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
यात नव्या सीझनमध्ये मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा हलदर यांच्यासह शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केले आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि झोया अख्तर आणि रीमा कागतीच्या टायगर बेबीद्वारे निर्मित या सीरिजचे ७ भाग आहेत, जे २४० देशांमध्ये प्रसारित होणार आहेत.
याबरोबरच सीरिजमध्ये दिया मिर्झा, मृणाल ठाकूर, राधिका आपटेसुद्धा खास भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पहिल्या सीझनला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता त्यामुळे आता या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘मेड इन हेवन २’चे सगळे भाग १० ऑगस्ट पासून प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत.