मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. ती ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माइंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ताजा खबर’ अशा अनेक वेब सिरीजमध्ये झळकली. तिच्या या सगळ्याच वेब सिरीज तुफान हिट झाल्या. ओटीटीमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. नुकतंच भुवन बामबरोबर ‘ताजा खबर’ या वेबसीरिजमध्ये श्रियाच्या कामाची प्रशंसा झाली.
आता यापाठोपाठ श्रियाच्या आणखी एका शॉर्ट फिल्मचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘सीता’ या आगामी शॉर्टफिल्ममध्ये श्रिया महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या शॉर्टफिल्मच्या पोस्टरमध्ये भगव्या रंगाची साडी परिधान करून श्रिया एका वेगळ्याच अवतारात आपल्या समोर येणार आहे. तिच्या हातात एक तान्ह बाळदेखील आहे.
आणखी वाचा : रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या सेटवरील व्हिडिओ लिक; चाहत्यांनी काढली ‘कबीर सिंग’ची आठवण
नेमकी ही शॉर्टफिल्म कशावर भाष्य करणारी आहे याबद्दल अजूनही गूढ कायमच आहे. याविषयी बोलताना श्रिया म्हणाली, “मी खूप शॉर्टफिल्म्स पाहिल्या आहेत, पण मी एका उत्तम स्क्रिप्टची वाट बघत होते. सीता ही एक अत्यंत ताकदवान कथा आहे. माझ्या पात्राचं नाव मैथिली आहे जी त्या लहान मुलाशी संवाद साधत आहे ज्याला एका लहान मुलीचं शव मिळालं आहे. ही शॉर्टफिल्म तुमच्या विचारांना खाद्य पुरवणारी आहे.”
श्रियाची ही शॉर्टफिल्म अभिनव यांनी दिग्दर्शित केली आहे. ही शॉर्टफिल्म हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे. ओटीटी या मध्यामातूनच श्रियाला खरी ओळख मिळाली. यावर्षी ती ‘गिल्टी माइंड्स’ आणि ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सिरीजमध्ये झळकली. तिच्या या दोन्ही वेब सिरीज तुफान हिट झाल्या.