‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. संघाची शिस्त, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं त्यांचं कार्य, देशाच्या राजकारणात त्यांचं योगदान याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता लवकरच ‘वन नेशन’ नावाची एक याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वर बेतलेली एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’चा १०० वर्षांचा इतिहास या सीरिजमधून उलगडला जाणार आहे. या सीरिजवर एक दोन नव्हे तर तब्बल सहा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक काम करणार आहेत.
विवेक अग्निहोत्री, प्रियदर्शन, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, जॉन मॅथ्यू मथन, मंजु बोरा आणि संजय पुराण सिंह असे सहा दिग्दर्शक मिळून या प्रोजेक्टवर काम करत आहेत. नुकताच याचा फर्स्ट लुक आणि पोस्टरसुद्धा प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपट समीक्षक, ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर करत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
आणखी वाचा : The Railway Men Teaser : भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या वेबसीरिजचा काळजाचा थरकाप उडवणारा टीझर प्रदर्शित
मीडिया रीपोर्टनुसार ही एक अँथॉलॉजि सीरिज असणार आहे जी तीन भागांमध्ये सादर केली जाणार आहे. RSS शी निगडीत प्रत्येक दिग्दर्शक आपआपल्या पद्धतीने गोष्ट मांडणार आहे. यावर्षीच्या सुरुवातीलाच विवेक रंजन अग्निहोत्री यांनी RSS वर आधारित प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि कंगनासुद्धा या चित्रपटाशी जोडली जाणार असल्याची शक्यता वर्तवली गेली होती.
आता या नव्या प्रोजेक्टच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप या सीरिजमध्ये कोणते कलाकार दिसणार आहेत याबद्दल कसलीही माहिती समोर आलेली नाही. मीडिया रीपोर्टनुसार या सीरिजच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून लवकरच यासंबंधीत माहिती समोर येईल. २०२५ मध्ये ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.