विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट चांगलाच गाजला. ३०० कोटी इतकी कमाई करणारा हा यावर्षातला पहिला हिंदी चित्रपट ठरला. हा चित्रपट बऱ्याच कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. काहींना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना हा चित्रपट फार एकांगी वाटला. आता याच धर्तीवर आधारतीत कश्मीरची एक वेगळीच बाजू दाखवणारी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं नाव आहे ‘तणाव’. काही दिवसांपूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा याची चांगलीच चर्चा झाली होती. नुकतंच या सीरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही वेबसीरिज इस्राईली वेबसीरिज ‘फौदा’चं अधिकृत adaption असणार आहे. या ट्रेलरमधून काश्मीरमधला तणाव, राजकीय संघर्ष आणि धार्मिक तेढ याचं चित्रण आपल्याला दिसतं. शिवाय काश्मीरची आणखी एक वेगळी बाजू आपल्याला या सीरिजमधून बघायला मिळणार आहे. ‘तणाव’ ही एक सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज आहे जी काश्मीरमधील एका स्पेशल युनिटच्या कारवायांवर प्रकाश टाकणार आहे.

आणखी वाचा : ‘आरआरआर’ने रोवले अटकेपार झेंडे; सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मिळाला ‘हा’ पुरस्कार

ही कथा जरी काल्पनिक असली तरी त्यातील संदर्भ हे वास्तवातीलच आहेत. फौदा ही वेबसीरिज इस्राईलमधील आतंकवादी संघटना आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यातल्या संघर्षावर बेतलेली आहे. तर ‘तणाव’मध्ये असाच संघर्ष आपल्याला बघायला मिळू शकतो. ट्रेलरच्या शेवटी येणारं “अगर तबाही हमारा मकसद होता तो अब तक कश्मीर कब्रस्तान बन चुका होता.” हे वाक्य ऐकून सीरिजमध्ये नेमकं काय बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा हे स्वतः या सीरिजचं दिग्दर्शनही करणार आहेत. या सीरिजमध्ये मानव वीज, अरबाज खान, रजत कपूर, झरीना वहाब हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच कित्येक नवीन चेहेरेदेखील या सीरिजमध्ये बघायला मिळू शकतात. ११ नोव्हेंबरपासून ही सीरिज सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. ‘तणाव’ ची निर्मिती Applause Entertainment ने Applause Productions च्या सहकार्याने केली आहे. Avi Issacharoff आणि Lior Raz यांनी निर्मिती केली आहे. तर येस स्टुडिओद्वारे वितरणाची जबाबदारी घेतली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony liv new upcoming series on kashmir issue tanaav trailer released avn