स्टँडअप कॉमेडीचा आजकाल चांगलाच सुळसुळाट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच काही स्टँड अप कॉमेडीयनमुळे निर्माण होणारे वाद तर अगदी नेहमीचे झाले आहेत. तरी या सगळ्यामध्ये एक कॉमेडीयन असा आहे जो आजवर कधीच कोणत्या वादात अडकला नाही. तो कॉमेडीयन म्हणजे झाकीर खान. कॉलेज ड्रॉप आऊट असलेल्या झाकीरने या क्षेत्रात स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. आता मात्र झाकीरच्या एका शोमुळे तो वादात अडकू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
Amazon miniTV या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाकीर आणि इतर काही कॉमेडीयन मिळून ‘फर्जी मुशायरा’ नावाने एक कार्यक्रम करतात. यामध्ये अत्यंत विचित्र आणि विनोदी अशा शायरीचा मुशायरा भरवला जातो. या शोच्या पहिल्या सीझनला चांगलीच पसंती मिळाली. मनोरंजन क्षेत्रातील बरीच लोकप्रिय मंडळी यामध्ये सहभागी होतात. याचा दूसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच नवीन भागाविषयी झाकीरने भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : ‘हर हर महादेव’ चित्रपटासाठी आवाज का दिलात? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…
हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना झाकीर म्हणाला, “हा एक अत्यंत बनावटी शो आहे, यामध्ये सगळ्या शायरी या खोट्या आहेत, मला स्वतःला अशी विचित्र आणि विनोदी शायरी प्रचंड आवडते. आज सोशल मीडियावर अशा गोष्टींना सर्वात जास्त लोकप्रियता मिळते. तुम्ही जेव्हा या नव्या सीझनमधील भाग बघाल तेव्हा तुम्हालाही हे खूप आवडेल. या शोमध्ये सहभागी होणारे कलाकारही यामध्ये मनापासून योगदान देतात. आम्हाला याचे आणखीन एपिसोड शूट करायला नक्की आवडेल.”
याबरोबरच झाकीरने कॉमेडी विश्वाच्या एकूण परिस्थितीवरही भाष्य केले. सध्या प्रेक्षक फार संवेदनशील झाला आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला दुखवू शकते असंही झाकीरने यामध्ये स्पष्ट केलं आहे. त्याच्या या शोमध्ये अशी कोणतीही वादग्रस्त शायरी सादर केली जाणार नाही असंही झाकीरने नमूद केलं आहे. तो म्हणाला, “जर कुणाला या शोमधील कंटेंट खटकत असेल तर मी स्वतः याबद्दल क्षमा मागेन. मी अशा वादांमध्ये पडणारा माणूस नाही.” झाकीरच्या या शोची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.