अभिनेता सुबोध भावे हा गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन सृष्टीत काम करत प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. अनेक वर्ष मराठी मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानंतर आता तो एका बिग बजेट हिंदी वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजचं नाव आहे ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड.’ या सिरीजमधील त्याचा फर्स्ट लूक त्याने नुकताच सोशल मीडियावरून शेअर केला. एकीकडे या सिरीजमधील त्याच्या भूमिकेसाठी त्याचे चाहते त्याचं कौतुक करत असतानाच दुसरीकडे नेटकरी त्याला ट्रोल करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुघल साम्राज्यातील अंतर्गत हेवेदावे, सत्ता आणि वारसाहक्कांसाठी झालेले संघर्ष यांची कथा रंगवणारी ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ ही वेड सिरीज लवकरच ‘झी 5’वर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये सुबोध भावे बिरबलाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच एका भव्य कार्यक्रम सोहळ्याच्या माध्यमातून या सिरीजची घोषणा करण्यात आली. तसंच याचा ट्रेलर सुबोधने सोशल मीडियावर पोस्ट करून या सिरीजमध्ये काम करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. त्या पाठोपाठ नुकताच त्याने या सिरीजमधील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘त्या’ अभिनेत्रीचं नशिब उजळलं, सुबोध भावेबरोबर करणार बहुचर्चित मराठी चित्रपट, टीझर पाहिलात का?

सुबोधने या सिरीजमधील त्याच्या बिरबलाच्या भूमिकेचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिलं, “फर्स्ट लूक टेस्ट.” याचबरोबर त्याने बिरबल, ताज डिवाइडेड बाय ब्लड, ३ मार्च, झी5 हे हॅशटॅगही वापरले. परंतु अनेकांना तो ही भूमिका साकारत आहे हे पटलं नाही.

एका नेटकऱ्याने लिहिलं, “सुबोध, तू ऐतिहासिक भूमिका करणार नाही असं बोलला होतास ना?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “सर मला वाटलं तुम्ही हिंदीमध्ये काम करणार नाहीत.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “नसिरुद्दीन शहा यांच्याबरोबर काम करायला मिळालं आहे या वेब सिरीजमधून म्हणून मध्यंतरी लेफ्टीस्ट पोस्ट शेअर करत होतास.” तर एकजण म्हणाला, “इतका स्मार्ट होता का बिरबल?” तर एकाने लिहिलं, “अरे देवा. यानंतर अकबर?” आता सुबोधची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

हेही वाचा : Video : “माझ्या करिअरचा बोर्डगेम…”; सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान ही वेब सिरीज ३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये अभिनेते नसीरुद्दीन शाह अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनारकलीची भूमिका अदिती राव हैदरी साकारणार असून सलीमच्या भूमिकेत अभिनेता आशीम गुलाटी दिसणार आहे. याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हेही वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave gets troll for his first look in taj divided by blood series rnv