The Archies Trailer: सुप्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मध्यंतरी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांचा डेब्यू असलेल्या ‘द आर्चीज’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आज ‘द आर्चीज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपटाचा ट्रेलर खूपच भव्य आहे आणि एक वेगळंच विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करण्यात येणार असल्याचं याच्या ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला ६० च्या दशकात घेऊन जातो. सर्व कलाकारांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या हेअरस्टाइलपर्यंत सर्व काही याच दशकातील असल्याचे दिसून येते. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना सुहाना, खुशी आणि अगस्त्य यांच्यातील प्रेमाचं त्रिकुट पाहायला मिळणार आहे. अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली असली तरी अगस्त्य नंदाचा अभिनय अधिक प्रभावी असल्याचं प्रेक्षकांनी नमूद केलं आहे.
आणखी वाचा : जेव्हा गिरीश कर्नाड नीना गुप्ता यांना म्हणाले, “तू कधीच हिरॉईन होणार नाहीस कारण…” नेमका किस्सा जाणून घ्या
झोया अख्तरच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मैत्री, मस्ती, डान्स आणि काही दुःखद क्षण पाहायला मिळतात, जे भावूक करणारे आहेत. चित्रपटाचे संगीतही खूप उत्तम आहे. सुहाना खानने कालच या चित्रपटाचा ट्रेलर ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्स इंडियाने शेअर केला आहे. काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालेला हा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला आहे अन् त्यांच्या पसंतीस उतरला आहे.
‘द आर्चीज’ मध्ये अनेक नवीन आणि तरुण कलाकार पाहायला मिळणार आहेत, ज्यात आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत अगस्त्य नंदा, वेरोनिका लॉजच्या भूमिकेत सुहाना खान, बेट्टी कूपरच्या भूमिकेत खुशी कपूर, जुगहेड जोन्सच्या भूमिकेत मिहिर आहुजा, वेदांग रैनाच्या भूमिकेत अदिती सेहगल, एथेल मग्स यांच्या भूमिकेत रेगी मेंटल यांचा समावेश आहे. हा चित्रपट ७ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.