बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी ‘धारावी बॅंक’ या त्याच्या वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. नुकतंच ‘धारावी बॅंक’मधील कलाकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत सुनील शेट्टीने या वेब सीरिजमधील त्याच्या भूमिकेबद्दलही सांगितलं.
‘धारावी बॅंक’ सीरिजमध्ये सुनील शेट्टीने एका दाक्षिणात्य नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमधील त्याच्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. सुनील शेट्टी त्याच्या सीरिजमधील भूमिकेबद्दल म्हणाला, “पहिल्यांदा ओटीटीसाठी काम करण्याचा अनुभव हा शाळेत जाण्यासारखा होता. सात-आठ वर्षांनंतर मला अशी दमदार भूमिका मिळाली. यातील संवाद फारच उत्कृष्ट आहेत. ‘धारावी बॅंक’ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मी थलावया आहे, असं मला वाटू लागलं”.
हेही वाचा >> “मला टकला मुलगा नवरा म्हणून…” अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा >> “आपके बाप का…” अनुपम खेर यांनी सांगितला किशोर कुमार यांच्याबरोबर घडलेला ‘तो’ किस्सा
सुनील शेट्टीच्या लूकची तुलना दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर करण्यात आल्यानंतर तो म्हणाला, “मी फक्त या सीरिजमध्ये थलावयाच्या भूमिकेत आहे. मला अनेक जण अण्णा नावाने हाक मारतात. याचा मला आनंद आहे. अण्णा म्हणजे मोठा भाऊ. रजनीकांत सरांचा मी मोठा फॅन आहे. त्यांच्याबरोबर मी एक चित्रपट केला आहे. मला त्यांच्याबरोबर आणखी काम करायला आवडेल. रजनीकांत सरांसारखं कोणीच बनू शकत नाही. ते सगळ्यांचे थलावया आहेत व राहतील”.
सुनील शेट्टीची ‘धारावी बॅंक’ ही वेब सीरिज ‘एम एक्स प्लेअर’वर १९ नोव्हेंबरला प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, नागेश भोसले, संतोष जुवेकर हे कलाकारही झळकले आहेत.