अभिनेत्री सुश्मिता सेन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतीच तिची रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या समाजसेविका गौरी सावंत यांच्या आयुष्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. यात सुश्मिताने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. श्री गौरी सावंत यांचं आयुष्य पडद्यावर सादर करणं ही सोपी गोष्ट नव्हती. अभिनेत्रीने या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली. याचाच अनुभव तिने ‘ब्रूट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.
हेही वाचा : ‘जवान’मध्ये दाक्षिणात्य कलाकारांची मांदियाळी का? बॉलिवूडच्या ‘या’ स्ट्रॅटेजीविषयी जाणून घ्या
मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकलेल्या सुश्मिता सेनसाठी ही भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं. याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, “ताली सीरिजमध्ये मला आधी गणेश आणि त्यानंतर गौरी सावंत यांची भूमिका करायची होती. गणेशच्या रुपात असताना, म्हणजेच एका पुरुषाप्रमाणे दिसण्यासाठी मला माझ्या छातीवर टेप (चिकटपट्ट्या) लावाव्या लागल्या. माझ्या छातीचा भाग संपूर्णपणे सपाट होईपर्यंत मला त्या टेप्स लावण्यात आल्या होत्या. सर्वाधिक त्रास या टेप पुन्हा काढताना व्हायचा कारण, त्या एवढ्या घट्ट पट्ट्या काढताना तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. हा अनुभव शारीरिकदृष्ट्या त्रासदायक होता.”
“एवढंच नव्हे तर मी क्रॉच गार्ड सुद्धा घालायचे, त्यामुळे मला व्यवस्थित बसता यायचं नाही. गौरी यांची भूमिका साकारण्यासाठी मला माझं वजन वाढवावं लागलं होतं. त्यांच्याप्रमाणे भारदस्त आवाजासाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागली होती. यामुळे शूटिंगच्यावेळी माझा घसा पूर्णपणे खराब झाला होता. ‘ताली’ सीरिजमध्ये सेटवरचे ७० टक्के कलाकार तृतीयपंथीयांच्या भूमिका साकारत होते आणि ही खूप मोठी गोष्टी आहे.” असं अभिनेत्रीने सांगितलं.
दरम्यान, ‘ताली’ सीरिज १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचं लेखन मराठमोळे लेखक क्षितिज पटवर्धन यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये मराठी अभिनेत्री कृतिका देव हिने गौरी यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे.