Aarya 3 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सीरिजमधून सुश्मिताने कमबॅक केलं होतं. या वेबसीरिजचे आतापर्यंत २ सीझन प्रदर्शित झाले आहे. ज्यात सुश्मिताचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुश्मिता तिसऱ्या सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला.
यात सुश्मिताने आर्या नावाच्या माफिया क्वीनची भूमिका निभावली आहे. वडिल आणि नवऱ्याच्या जाण्यानंतर त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाची सूत्रं आर्याच्या हाती येतात, इच्छा नसतानाही तिला या गुन्हेगारी विश्वात उतरावं लागतं अन् इथून पुढे तिचा माफिया क्वीन बनण्यापर्यंतचा प्रवास आपण आधीच्या दोन सीझनमध्ये पाहिला आहे.
आणखी वाचा : ‘सिंघम अगेन’च्या क्लायमॅक्ससाठी खर्च होणार ‘इतके’ कोटी; या २ अभिनेत्यांची होणार कॉप युनिव्हर्समध्ये एंट्री?
आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून आर्याचा प्रवास इथे संपणार अशी कुणकुण लागत आहे. टीझरमध्ये आर्याचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि तिच्या मुलांसमोर तिला गोळी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच सुश्मिताचं पात्र आर्याच्या तोंडी “इस कहानी का अंत ऐसा होगा ये कभी नहीं सोचा था.” ही वाक्यदेखील आपल्याला ऐकायला मिळत आहे अन् टीझरच्या शेवटी आर्या खाली कोसळताना दिसत आहे.
अद्याप हा टीझर आहे त्यामुळे नेमकं या नव्या सीझनमध्ये काय कथानक पाहायला मिळणार आहे किंवा यात आणखी काय ट्विस्ट येणार आहेत ते सीरिज आल्यावर समोर येईलच. पण या टीझरमध्येसुद्धा सुश्मिताचा डॅशिंग अंदाज आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. राम मधवनी यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
या सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. आता ‘आर्या’चा सीझन ३ पुढच्या महिन्यात म्हणजेच ३ नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुश्मिता नुकतीच रवी जाधवच्या ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये झळकली आता तिला पुन्हा आर्याच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.