चित्रपट आणि सीरिजप्रेमींसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच आहे. येथे वेगवेगळ्या आशयाचे असंख्य चित्रपट आणि शो सहज उपलब्ध असतात; मग ते थ्रिलर असो, रोमँटिक, अॅक्शन किंवा हॉरर. ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भाषांमध्ये भरपूर फिल्म्स आणि सीरिज आहेत, पण यापैकी कोणता चित्रपट चांगला आहे हे ठरवणं खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाच अशा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची माहिती देणार आहोत, ज्यांच्या कथेमुळे तुम्ही शेवटपर्यंत स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही. या यादीमध्ये ‘द गर्ल ऑन द ट्रेन’पासून ‘रात अकेली है’सारखे चित्रपट आहेत.
द गर्ल ऑन द ट्रेन (The Girl on the Train)
२०२१ साली आलेला हा थ्रिलर मिस्ट्री चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. रिभु दासगुप्ता यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि अविनाश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एका घटस्फोट झालेल्या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. या महिलेला एका जोडप्याचे आकर्षण वाटते आणि नंतर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना हादरवून सोडतात. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.
हेही वाचा…सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात? मग नक्की पाहा नेटफ्लिक्सवरील हे सिनेमे
रात अकेली है (Raat Akeli Hai)
हनी त्रेहान यांनी दिग्दर्शन केलेला ‘रात अकेली है’ हा सुद्धा एक थ्रिलर मिस्ट्री चित्रपट आहे. हा चित्रपट २०२० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राधिका आपटे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका नवविवाहित व्यक्तीच्या खुनाभोवती फिरते. या खुनाची तपासणी एक पोलिस अधिकारी करतो. या गुन्ह्याचा उलगडा करताना येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. हा चित्रपट प्रेक्षकांना ‘नेटफ्लिक्स’वर पाहता येईल.
रहस्य (Rahasya)
२०१५ साली आलेल्या ‘रहस्य’ या थ्रिलर चित्रपटात केके मेनन, टिस्का चोप्रा आणि आशीष विद्यार्थी यांनी दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा एका वडिलांच्या सूडाभोवती फिरते. यात वडिलांचं पात्र एका दाम्पत्याकडून झालेल्या अन्यायाचा बदला घेत अशा आशयाची सिनेमाची कथा आहे. या चित्रपटाच्या कथानकातील रहस्य आणि ट्विस्ट प्रेक्षकांना थरारक अनुभव देतात. हा चित्रपट ‘झी 5’ वर पाहता येईल.
हेही वाचा…या वीकेंडला OTT वर अनुभवा थरार, पाहा नेटफ्लिक्सवरील ‘या’ पाच थ्रिलर वेब सीरिज
इत्तेफाक (Ittefaq)
२०१७ साली आलेला सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. अभय चोप्राने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाची कथा दुहेरी हत्येच्या भोवती फिरते. हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर उपलब्ध आहे.
हेही वाचा…‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
एक हसीना थी (Ek Hasina Thi)
उर्मिला मातोंडकर आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एका सुडाची कथा दाखवण्यात आली असून हा थरारक चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट यूट्यूब आणि प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.