हिजडा, छक्का असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा समाजाच्या भुवया आजही उंचावतात. आजही दोन हात लांब जा, थोडं अंतर ठेवा असंच साधारण धोरण असतं. साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी ही परिस्थिती आणखी वाईट होती. तृतीय पंथीयांना सर्वोच्च न्यायालयाने थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली आहे. त्यांचा इतका वर्षांचा लढा यशस्वी ठरला आहे. मात्र समाजातून मिळणारी हेटाळणी, शेरेबाजी हे अद्यापही कायम आहे. त्यांच्या विषयी असलेले समज-गैरसमज हे अद्यापही कायम आहेत. हे सगळं मांडण्याचं कारण ‘ताली’ नावाची वेब सीरिज .
कुठे पाहू शकता ताली?
‘ताली’ नावाची वेबसीरिज जिओ सिनेमावर रिलिज झाली आहे. मराठमोळा दिग्दर्शक रवि जाधव यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ही वेबसीरिज श्रीगौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. श्रीगौरी सावंत या तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ही भूमिका सुश्मिता सेनने साकारली आहे. या वेबसीरिजमध्ये हेमांगी कवी, नंदू माधव, ऐश्वर्या नारकर, सु्व्रत जोशी असे मराठी कलाकारही आहेत. मध्यवर्ती भूमिकेत म्हणजेच श्रीगौरी सावंत यांच्या भूमिकेत आहे सुश्मिता सेन.
कोण आहेत श्रीगौरी सावंत?
गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील पोलीस होते. तर आई गृहिणी होती. त्यांचं नाव गणेश असं ठेवण्यात आलं होतं. गणेश नंदन सात वर्षांचे होते तेव्हा त्यांची आई वारली. लहानपणापासून आपल्यात आई दडली आहे असं गणेशला वाटत होतं. गणेश मुलगा म्हणून जन्माला आला तरीही पुढे तो गौरी सावंत म्हणून त्यांनी स्वतःची नवी ओळख तयार केली. श्रीगौरी सावंत या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तसंच त्या गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांसाठी काम करतात. सखी चारचौघी ट्रस्टची स्थापनाही त्यांनी केली. तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून त्या काम करतात. गणेशने वयाच्या १३-१४ व्या वर्षी आपलं घर सोडलं. त्या मुंबईत आल्या. गणेश सावंत यांनी वेजिनोप्लास्टी केली आणि त्या गौरी सावंत झाल्या. त्यांना अम्मा, अक्का अशाच नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यांना सहन करावा लागलेला संघर्ष हा सोपा नव्हता. हा संघर्ष रवि जाधव यांनी ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये दाखवला आहे.
काय आहे ताली वेब सीरिजमध्ये?
श्रीगौरी सावंत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या एकत्र कुटुंब पद्धतीत राहात होत्या. सर्वात आधी वेबसीरिजमध्ये हीच गोष्ट वगळण्यात आली आहे. श्रीगौरी सावंत, त्यांची बहीण आणि आई-वडील हे चौघेच राहात असतात असं दाखवलं गेलं आहे. गणेश आणि गौरी या दोन्ही भूमिका सुश्मिता सेनने साकारल्या आहेत. तसंच लहानपणीच्या गणेशची भूमिका ही कृतिका देवने साकारली आहे. आपल्या घरात असलेलं वातावरण, आईशी असलेली ओढ, बहिणीशी असलेली ओढ, वडिलांचं न बोलणं. आपण कोण आहोत? याचं मनात चाललेलं द्वंद्व हे सगळं कृतिकानेही उत्तम साकारलं आहे. खासकरुन या वेबसीरिजमध्ये जेव्हा पळून गेलेला गणेश घरी परततो आणि पुन्हा पळून जातो तो प्रसंग उत्तम झाला आहे.
हे पण वाचा- सुश्मिता सेनची वेबसीरिज पाहिल्यानंतर सायली संजीवची पोस्ट, म्हणाली “ताली तर…”
आधी स्वतःशी चालणारं द्वंद्व आणि मग समाजाकडून मिळणारा फक्त तिरस्कार, घरात वडिलांनी धरलेला अबोला. त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता हे सगळं खूप छान उभं करण्यात आलं आहे. मात्र ‘ताली’ या वेब सीरिजचा जो USP आहे तो म्हणजे सुश्मिता सेन. दुर्दैवाने सुश्मिताच या वेब सीरिजचा सर्वात मोठा ड्रॉबॅकही ठरते. तृतीय पंथीय गौरी सावंत यांच्या भूमिकेसाठी सुश्मिता सेनने घेतलेली मेहनत दिसते आहे. पण ती तो संपूर्ण संघर्ष पोहचवू शकत नाही. कारण आपण सुश्मिता सेनलाच आपण पाहतोय हेच ओपनिंग फ्रेमपासून जाणवत राहतं. या वेबसीरिजसाठी एखाद्या पुरुष कलावंताला संधी दिली गेली असती तर कदाचित त्याने या संघर्षाला आणखी न्याय दिला असता. वेब सीरीजमधले संवाद हे वेबसीरिजची जान आहेत. त्या जोरावर अख्खी सीरिज तारून नेण्यात आली आहे. कॅमेरा वर्कही चांगलं झालं आहे. पण गौरीचं दुःख काळजाला छेद देऊन जात नाही.
हे पण वाचा- “सुव्रत तू आज मला…”;’ताली’मध्ये तृतीयपंथीची भूमिका साकारलेल्या नवऱ्यासाठी सखी गोखलेची खास पोस्ट, म्हणाली…
सुश्मिताने २००६ मध्ये कल्पना लाजमी दिग्दर्शित चिंगारी हा सिनेमा केला होता. या सिनेमात तिने शरीर विक्रय करणाऱ्या महिलेची भूमिका केली होती. त्या भूमिकेची बरीच छाप या तालीतल्या श्रीगौरीच्या भूमिकेवर दिसून येते. सुश्मिताने लावलेला आवाज, तिचं पुरुषी दिसण्याचा प्रयत्न, कपाळावर भलंमोठं कुंकू हा सगळा ठसका जमून आलाय. पण गौरी सावंत यांची एक ग्लॅमरस कथा आपण पाहतोय असं वाटत राहतं. त्यामुळे ताली ही वेबसीरिज फिक्की ठरली आहे. सुव्रत जोशी या मराठी कलाकाराने तृतीय पंथीयाची भूमिका केली आहे. तो या भूमिकेत चपखल बसला आहे.
‘ताली’चा वेग संथ
‘ताली’चा वेगही संथ आहे. या वेबसीरिजचा वेग वाढवून थोडे आणखी बारकावे दाखवण्यात आले असते तर जास्त बरं झालं असतं. तसंच सिनेमात एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटना या खूप सहजपणे घडतात, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष हा तसा फिका वाटतो. त्यामुळेच खूप चांगला प्रयत्न करुनही सीरिज मनाला भिडत नाही. नंदू माधव, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी, सुव्रत जोशी आणि सुश्मिता सेन या सगळ्यांची कामं उत्तम झाली आहेत. तसंच एका वेगळ्या विषयावर वेब सीरिज तयार करण्याचं धाडस रवि जाधव यांनी केलं त्यासाठी त्यांचं कौतुक करायला हवं. मात्र गौरी सावंत यांच्या आयुष्यातल्या तपशीलांवर आणखी काम करायला हवं होतं असं वाटत राहतं.
गौरी सावंत या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की आम्ही (तृतीयपंथीय) जी टाळी वाजवतो ती टाळी आरती म्हणतानाची टाळी नाही. ती आम्हाला सहन करावी लागणारी वेदना, आमच्या मनात असलेलं द्वंद्व, आमची केलेली अवहेलना या सगळ्याच्या रागातून आलेली टाळी आहे. ‘ताली’ या वेबसीरिजमध्ये नेमका हाच धागा कुठेतरी तुटून गेलाय असं जाणवतं. त्यामुळेच ही काळजाला न भिडणारी टाळी आहे.