मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर असे तगडे कलाकार मंडळी असलेले ‘चारचौघी’ नाटक रसिक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. रंगभूमीवर हे नाटक जोरदार सुरू आहे. नुकताच या नाटकाचा २२२वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला ‘ताली’ वेब सीरिजच्या टीमनं हजेरी लावली होती. यासंबंधित नुकतीच ‘ताली’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
रवी जाधव यांनी ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमबरोबरचा फोटो शेअर केला आहे. आणि लिहीलं आहे की, “काल आमच्या ‘ताली’ टिम मधील श्रीगौरी सावंत, क्षितीज पटवर्धन, नंदु माधव यांच्याबरोबर ‘चारचौघी’ या नाटकाचा २२२वा हाऊसफुल प्रयोग पाहिला. अत्यंत ताकदीचं नाटक. प्रत्येक बाबतीत…लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य सर्व काही अप्रतिम…असं क्वचितच होतं…”
हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट, स्वरा मल्हार कामत नाही तर…; पाहा नवा प्रोमो
“पण प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रत्येक कलाकार जेव्हा समरसून काम करुन आपले १०० टक्क्यांहून जास्त योगदान देतो तेव्हाच अशी जबरदस्त कलाकृती जन्माला येते. नाटकाबद्दल जास्त डिटेल्स लिहीत नाही. कारण ‘चारचौघी’ हे नाटक माझ्यासारख्याची प्रतिक्रिया वाचण्याचे नाही तर प्रत्यक्ष पाहून अनुभवायचे नाटक आहे. हॅट्स ऑफ टीम चारचौघी,” असं रवी जाधव यांनी लिहीलं आहे.
दरम्यान, ‘चारचौघी’ या मूळ नाटकाचा पहिला प्रयोग मराठी रंगभूमीवर १९९१ रोजी सादर झाला होता. यामध्ये दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.