‘ताज – डिवायडेड बाय ब्लड’ ही वेब सीरिज सध्या त्याच्या दुसऱ्या सीझनमुळे चांगलीच चर्चेत आहे. मुघल साम्राज्याची, अकबराची एक वेगळी बाजू फार वेगळ्या पद्धतीने या वेब सीरिजमधून मांडण्यात आली आहे. नसीरुद्दीन शाह, धर्मेद्र यांच्यासारखे नावाजलेले कलाकार या सीरिजमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. याबरोबरच याच्या विषयामुळेही मध्यंतरी ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या सीरिजच्या दिग्दर्शकाच्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा चर्चा होत आहे.
विभू पुरी यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी सर्वप्रथम जाहिरातक्षेत्रात काम सुरू केलं अन् नंतर विशाल भारद्वाज अन् संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. आयुष्मान खुरानाचा ‘हवाईजादा’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी या वेब सीरिजच्या कथानकाबद्दल अन् मुघलांबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “आदिपुरुषसारख्या चित्रपटांमुळेच…” प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी बॉलिवूडला सुनावले खडेबोल
या मुलाखतीमध्ये मुघल आक्रमणकर्ते यांच्यावर त्यांचं मत विचारल्यावर ते म्हणाले, “मला मनापासून असं वाटतं की मुघल हे आक्रमणकर्ते नव्हते. आपल्या देशाची लूट करण्याच्या हेतूने ते इथे आले नव्हते. ते आले, आपल्या देशाच्या प्रेमात पडले अन् त्यांनी राज्य केलं. इतर राज्यकर्त्यांप्रमाणेच तेदेखील तितकेच हिंदुस्तानी आहेत. याबरोबरच त्यांनी त्यांची परंपरा, संस्कृती, संगीत, कला ही आपल्या देशार रुजवली. त्यामुळे मी तरी त्यांना आक्रमणकर्ते मानत नाही, त्यांच्यापैकी काही जण क्रूर होते तर काही नव्हते. शिवाय कौटुंबिक कलह कोणत्या साम्राज्यात नव्हते? सिंहासनावर हक्क सांगण्यासाठी कायम रक्त वाहिलं आहे.”
पुढे ते म्हणाले, “आपण लहानपणापासूनच त्यांच्याबद्दल वाचत आलो आहोत त्यामुळे मुघलांबद्दल जास्त आकर्षण वाटूच शकतं. ताज महाल आपला आहे, मुघल गार्डन आपलं आहे, इतकंच नव्हे लाल किल्लाही आपलाच आहे. आपण आजही तिथे राष्ट्रध्वज फडकावतो. जर मुघल लुटारू असते तर अशाप्रकारे त्यांना आपण साजरं केलं नसतं.”