सुव्रत जोशी हा मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सुव्रत घराघरांत लोकप्रिय झाला. अभिनेत्याने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर पाडली. अलीकडेच त्याने ‘ताली’ सीरिजमध्ये केलेल्या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कलाकार धडपड करत असतो. परंतु, प्रत्येक कलाकार यशस्वी होण्यामागे त्याच्या गुरुचा सर्वात मोठा हातभार असतो. अभिनेता सुव्रत जोशीने सोशल मीडियावर नुकतीच त्याच्या गुरुंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : ‘तू चाल पुढं’मध्ये वैरी तर ऑफस्क्रीन ‘असा’ आहे बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा अन् दीपा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत

सुव्रत जोशीने त्याच्या गुरु त्रिपुरारी मॅमसाठी शेअर केली पोस्ट

त्रिपुरारी मॅडमच्या आठवणीत श्रद्धांजली पत्र लिहिणं हे माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांचं मार्गदर्शन हे केवळ चार भिंतींच्या वर्गापुरतं मर्यादित नव्हतं. रंगभूमीच्या क्षेत्रात उत्कृष्टता आणि शिस्त कशी साधली जाऊ शकते याच जिवंत उदाहरण त्या होत्या. त्या क्वचितच मोठ्या आवाजात बोलायच्या पण, एखादं सादरीकरण करताना त्यांची तीक्ष्ण नजर सतत जाणवत असे. त्रिपुरारी मॅमला भेटण्यापूर्वी…कला क्षेत्रातील अभ्यास माझ्यासाठी खूपच सामान्य होता. परंतु, त्यांनी माझा कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यांनी थिएटर निर्मिती प्रक्रियेत लोकशाही संस्कृती आणली. ती देखील गुणवत्तेशी तडजोड न करता. त्यांचं नाट्यलेखन पाहिलंत, तर तुम्हाला शांतात, लोकशाही, दूरदृष्टीचा परिचय होईल. रक्तरंजित क्रांतीच्या क्रोधावर प्रकाश टाकणारं ‘सान सातवन का किस्सा-अजीजुन्निसा’ हे नावाचं नाटक लिहिण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं. त्यांच्या जाण्याने आज आम्ही रंगभूमीवरील आणखी एक मजबूत स्त्रीवादी आणि मानवतावादी आवाज गमावला आहे.

मला याठिकाणी त्यांच्या कामाची एक आठवण आवर्जुन सांगावीशी वाटते ती म्हणजे, आम्ही पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये अजीजुन्निसा नाटक सादर करत होतो. तेव्हा त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुदैवाने आम्ही बचावलो आणि आम्हाला ताबडतोब दिल्लीला परतण्यास सांगण्यात आलं. त्या रात्री आमची एक मिटिंग झाली. त्या म्हणाल्या, “आपण आयुष्यभर नाटक करतो पण एक क्षण असा येतो की, आपल्याला उत्तर मिळतं की आपण नाटक का करतोय? मला वाटतं आपण इथेच थांबून उद्याचा कार्यक्रम करायला हवा… कारण हेच त्या दहशतवाद्यांसाठी योग्य उत्तर आहे.” अर्थात त्यांनी केवळ आवाहन केलं होतं. जर एखाद्यालाही सादरीकरण न करता पुन्हा जायचं असेल तर संपूर्ण टीम परत जाईल असं त्यांचं ठाम मत होतं. अशाप्रकारे त्या लोकशाही पद्धतीने काम करायच्या. मला अभिमान वाटतो की, आमच्या वर्गातील प्रत्येकाने थांबण्याचा निर्णय घेतला.

देशातील काही महत्त्वाच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचं योगदान होतं. मॅम आणि अरुणा रॉय चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यांच्या नाटकाचा एक भाग होण्याची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. उत्तम लेखणी आणि रंगभूमीच्या सहाय्याने रुजलेली, सुशिक्षित भारतीय स्त्री काय साध्य करू शकते याचं त्या खरोखरचं जिवंत उदाहरण होत्या. या जगाला अधिक शांततापूर्ण बनवण्यासाठी रंगभूमी हे एक मजबूत साधन हे कायम लक्षात ठेवणं हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. त्रिपुरारी मॅम आम्ही तुम्हाला कायम स्मरणात ठेवू. तुमची तत्त्व आणि प्रेम आम्हाच्या बरोबर आयुष्यभर राहिल. मी तुमचा सदैव ऋणी आहे.

अशी भावुक पोस्ट सुव्रतने त्याच्या गुरुंसाठी शेअर केली आहे. दरम्यान, सुव्रतच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच त्याने ताली चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. मराठीसह हिंदी सिनेक्षेत्रातही त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tali fame actor suvrat joshi shared special post for his teacher sva 00
Show comments