करोना महामारीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सना खूप महत्त्व प्राप्त झाले. लॉकडाऊनमुळे सिनेमागृहे बंद होती, त्यावेळी अनेक निर्मात्यांनी चित्रपट ओटोटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केले. प्रेक्षकही मोठ्या संख्येने ओटीटीकडे वळले. या ओटीटीने फक्त प्रेक्षकांचं मनोरंजनच केलं नाही तर अनेक कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली. आता अनेक कमी बजेटचे सिनेमे व सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होतात. त्यातील कलाकार लक्ष वेधून घेतात. त्यापैकी अनेकांना त्यांच्या कामासाठी प्रचंड लोकप्रियताही मिळते. या कलाकारांच्या यादीतलं एक नाव म्हणजे अभिनेत्री आरुषी शर्मा होय. एकवेळ अशी आली होती की आरुषी खासगी क्षेत्रात नोकरी शोधत होती, पण ओटीटीने तिचं नशीब पालटलं.
आरुषी शर्माने २०१५ मध्ये इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटामधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात आरुषी एका सीनमध्ये देवी सीतेच्या छोट्या भूमिकेत दिसली होती. ‘तमाशा’मध्ये काम केल्यानंतर तिने २०१९ साली इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि रणदीप हुडा यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. आरुषी रणदीप हुड्डाबरोबर दिसली होती. तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं होतं.
दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या
करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागलं होतं. या काळात उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडले होते. या काळात सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं, चित्रपटगृहे बंद होती. तेव्हा बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना संघर्ष करावा लागला होता. लॉकडाऊनचा आरुषीच्या आयुष्यावरही परिणाम झाला. अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरला सुरुवातच झाली होती आणि लॉकडाऊनमुळे तिला मोठा ब्रेक घ्यावा लागला. तिला काम मिळत नव्हतं, त्यामुळे पैशांसाठी तिने अभिनय सोडून इंजिनिअरींग कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. याचा खुलासा तिनेच एका मुलाखतीत केला आहे.
आरुषीने सांगितलं की तिला काही वर्षे संघर्ष केल्यानंतर २०२२ मध्ये मुख्य महिला कलाकार म्हणून नेटफ्लिक्सच्या ‘जादुगर’ चित्रपटात जितेंद्र कुमार सोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी आरुषीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. नंतर ती ‘काला पानी’ या सीरिजमध्येही दिसली होती. प्रचंड संघर्षानंतर आरुषीला मागच्या दोन वर्षात चांगले प्रोजेक्ट मिळाले.