चित्रपटांचं शूटिंग करत असताना अनेक स्टंट सीन करण्यासाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. कारण या वेळी एक अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची बॅाडी डबल बनली आहे. ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. ‘अथांग’मध्ये तेजस्विनीने केतकी नारायणसाठी बॅाडी डबल म्हणून काम केलं आहे.
हेही वाचा – तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये
‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजची तेजस्विनी निर्माती आहे. पडद्यावर जरी तेजस्विनी प्रत्यक्ष झळकली नसली तरी पडद्यामागे मात्र तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या वेबसीरिजमधील काही दृश्यांना तिचा आवाजही लाभला आहे.
हेही वाचा – काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”
याबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ‘’ एक कलाकार म्हणून वावरताना आपल्यावर फार जबाबदारी नसते. शूटिंग, डबिंग करायचे की आपले काम झाले. परंतु निर्माती म्हणून वावरताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कागदावर श्रीगणेशा लिहिण्याच्या प्रक्रियेपासून मी यात सहभागी होते आणि मी हे काम एन्जॅायही केले. अनेकांनी मला विचारले यात तू एखादी भूमिका का नाही केलीस, तर निर्माती म्हणून या भूमिकेला मला १०० टक्के न्याय द्यायचा होता आणि अभिनय करून मला हे शक्य झाले नसते. मुळात यात मी पडद्यावर जरी दिसत नसले तरी पडद्यामागे मी अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. यात काही ठिकाणी मी आवाजही दिला आहे. त्यामुळे विविध भागांत मी काम केले आहे.’’
‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.