विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊस निर्मित ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती, पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाला कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आधी पश्चिम बंगाल व तमिळनाडूमध्ये या चित्रपटाला विरोध झाला, त्यानंतर चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला खरा पण त्याला होणारा विरोध पाहता आता ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील आता पुढे येऊन हा चित्रपट घ्यायला नकार देत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचं म्हणणं आहे की फिल्म इंडस्ट्री त्यांच्या विरोधात कट कारस्थान करत आहे.
आणखी वाचा : कार्तिक आर्यनचा इकोनॉमी क्लासमधून विमान प्रवास; अभिनेत्याला बघून प्रवासी झाले चकित
‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ओटीटीवर जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. याबद्दल सुदीप्तो म्हणाले, “आम्हाला अजूनही कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मकडून साजेशी ऑफर मिळालेली नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत. असं वाटतंय की फिल्म इंडस्ट्री आमच्या विरोधात उभी राहून आम्हाला शिक्षा देऊ पहात आहे. आमच्या चित्रपटाची कमाई पाहून बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत आहे. कोणतेही मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट घेण्यास तयार नाही आहेत.”
‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्यघटनेवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.१५ ते २० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.